अलिबाग, दि. ८ - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग किहीम येथील बंगला शुक्रवारी नियंत्रित स्फोटांच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंगल्याच्या चारही बाजूने सुरुंग लावण्यात आली होती. तब्बल ३० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. पण इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा वापर करुनही बंगला जमीनदोस्त झाला नाही. बंगला खचला असून पुढील १५ ते २० दिवसांत तो मशिनच्या मदतीने पाडण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नीरव मोदी यांच्या बंगल्यावर दोन महिन्यांपूर्वी कारवाईला सुरुवात झाली होती. मात्र मशीनच्या साह्याने बंगल्याचे पाडकाम करण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे हे काम थांबविण्यात आले. दगडी आणि आरसीसी बांधकाम असल्याने हा बंगला सुरुंग लावून पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी लोणेरे येथील बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले.
शुक्रवारी सकाळी बंगल्याच्या चारही बाजूला सुरुंग लावण्यात आले. यासाठी तब्बल तीस किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. बंगल्यातील पिलरला पाडलेल्या होलमध्ये स्फोटके भरण्यात आली आणि वायरिंग बॅटरीच्या सहाय्याने जोडून ब्लास्ट करण्यात आला. स्फोटानंतर बंगला जमीनदोस्त होईल, असे वाटत होते. मात्र, बंगला जमीनदोस्त झालाच नाही. अखेर पथकाने बंगल्याची पाहणी केली असता भक्कम बांधकामामुळे बंगला जमीनदोस्त झाला नाही, मात्र बंगला खचल्याचे समोर आले. जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, नियंत्रित स्फोटामुळे बंगला पाडण्यात मदत झाली आहे. आता मशिनच्या मदतीने बंगला पाडण्यात येईल. यासाठी १५ ते २० दिवस लागतील.
सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन बांधकाम करणाऱ्यांसाठी हा एक इशाराच आहे. नियमांचे उल्लंघन करुन बांधकाम केल्यास अशीच कारवाई होणार, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
राजकीय
ये दीवार टुटती क्यू नही! नीरव मोदीच्या बंगल्यापुढे हरली स्फोटकं
बंगल्यातील पिलरला पाडलेल्या होलमध्ये स्फोटके भरण्यात आली आणि वायरिंग बॅटरीच्या सहाय्याने जोडून ब्लास्ट करण्यात आला


