मेणवली, दि. ८ - घटस्फोटीत महिलेला लग्नाचे अमिष दाखवून अनैतिक संबंध ठेऊन जन्मलेल्या बाळाची लाखो रुपयांना विक्री केल्याची घटना पाचगणीत महिलादिनाच्या पुर्वसंध्येला उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजेश रमेश चौरसिया (वय 40) या मुळचा परप्रांतीय असणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम पाचगणी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
पाचगणी येथील मागासवर्गीय घटस्फोटित 23 वर्षीय अबला महिला पाचगणी मधील परप्रांतीयाची शिकार ठरली आहे. ओळखीतून परिस्थितीचा गैरफायदा घेवून राजेश रमेश चौरसिया याने संबंधित महिलेशी अनैतिक संबंध ठेवत अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाची पाचगणीतीलच एका शाळेची संस्थापिकेच्या मध्यस्तीने लाखो रुपयाला विक्री केली आहे, अशी माहिती संबंधित पीडितेने पोलिसांना दिली आहे. चौरसिया हे कुटुंब मूळचे उत्तर भारतातील असून गेल्या तीन-चार पिढ्यांपासून व्यवसायानिमित्त पाचगणीतच स्थायिक झाले आहे. एकत्रित राहणाऱ्या चौरसिया कुटुंबाने पाचगणीत चांगले बस्तान बसवलेले असल्याने पाचगणीच्या मुख्य बाजार पेठेत त्यांची दुकाने आहेत. तर काही काळ पाचगणी नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदाची संधी मिळवल्याने पाचगणी परिसरात राजकीय वजन व दबदबा निर्माण केला आहे.
राजेश चौरसिया याने याच संधीचा फायदा घेवून पीडित महिलेच्या भावाशी ओळख वाढवली. तसेच आपणही घटस्फोटित असल्याचे भासवून तिच्या कुटुंबाला विश्वासात घेत सदर घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. पीडित महिलेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व नाजूक असल्याने ते राजेशच्या भुलभुलैया राजेशाही थाटाला बळी पडले. राजेश याने लवकरच लग्न करू असे सांगत पीडित महिलेला फसवणूक करत वारंवार तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले. यातूनच पीडित महिलेला दिवस गेले. पीडित महिलेला व कुटुंबाला ही घटना लक्षात आल्यावर राजेश यांच्याकडे तात्काळ लग्नासाठी हट्ट धरला. मात्र राजेश हा विवाहित असल्याचे समजले. तसेच राजेश याने पीडितेच्या मागणीला न जुमानता लग्न करण्यास नकार देवून गर्भपात करण्यासाठी धमकी देवून जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास भाग पाडले. यातून पीडित महिलेला त्रास होवून 8 व्या महिन्यातच तिने बाळाला जन्म दिला.
पीडित महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतरही दानवी वृत्तीच्या राजेशने बाळाची व आईचे संगोपनाची जबाबदारी घेण्याऐवजी मुलीला व तिच्या आईला विश्वासात घेवून काही दिवस बाळाला माझ्या बहिणीकडे ठेवू असे खोटे सांगून एक महिन्याचे बाळ स्वतःच ताब्यात घेतले. बाळाची व आईची ताटातूट झाल्यामुळे पीडित महिलेने बाळासाठी तगादा लावला असता राजेशने चक्क बाळाची विक्री केली असल्याचे उघड झाले. त्यानंतर पीडित महिलेने पाचगणी पोलिसात धाव घेतली. पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी तात्काळ तपासाची सूत्र वेगाने हलवत आरोपीस जेरबंद करत बाळ विक्रीसाठी मध्यस्ती केलेल्या महिलेला पोलीस ठाण्यात धरून आणले. परंतु विकलेले बाळ अजून हाती घेण्यास विलंब होणार असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
सातारा जिल्हा
पाचगणीत घटस्फोटीत महिलेवर अत्याचार
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाची लाखो रुपयांना विक्री


