सणबूर, दि. ७ – माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना मंत्री असताना मतदार संघातील जे-जे रस्ते करता आले नाहीत. ते-ते सर्व रस्ते मी आमदार म्हणून पुर्णत्वाकडे नेले याचा मला आनंद वाटतो. स्पष्टच सांगायचे झाल्यास पाटण मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधायला तसेच त्यांच्या बालेकिल्ल्यातील मुलभूत गरजांची कामे करायला पाटणकर माझ्यापेक्षा कमीच पडले असल्याचा टोला आ. शंभूराज देसाई यांनी लगावला.
निगडे, ता. पाटण येथे राज्य शासनाच्या हरीत ऊर्जा योजनेतंर्गत कसणी-निगडे-माईंगडेवाडी या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन, जाधववाडी मेंढ येथील पिण्याच्या पाण्याची योजना, निगडे येथील सार्वजनीक सभागृहाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कसणी-निगडे-माईंगडेवाडी या 8 किमी रस्त्यांच्या कामांकरीता त्यांनी 3.27 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, गटनेते पंजाबराव देसाई, सदस्या सीमा मोरे, शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, नारायण कारंडे, अंकुश महाडिक, नानासो साबळे, मनोज मोहिते, विकास गिरीगोसावी, दत्तात्रय पाटील, बजरंग डिसले, सरपंच नैना कदम, विलास गोंडाबे, कसणी सरपंच मिनल मस्कर, खाशाबा डिसले, ज्ञानदेव कदम, जिंती सरपंच दामाजी कदम, शंकर पवार, आत्माराम पुजारी, सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. देसाई म्हणाले, पवारवाडी कुठरेपासून या विभागात येताना पवारवाडी, कसणी, पागेवाडी, कुठरे, जाधववाडी, मत्रेवाडी, निवी, वरचे घोटील, निगडे व माईंगडेवाडी या गावात गत चार वर्षात विकासकामे केली आहेत. मात्र तालुक्याच्या माजी आमदारांनी त्यांच्या काळात या गावांना किती रुपयांचा निधी मंजूर करुन दिला. हा संशोधनाचा विषय आहे. 2014 च्या निवडणूकीपासून ते या विभागात आले देखील नसतील याची मला खात्री आहे. मग कोणतेही विकासाचे काम न देणाऱ्यांना आपण मते देवून आपल्या पदरात काय पाडून घेणार आहे. याचा विचार या विभागातील जनतेने करावा. बांधकाम मंत्री असताना त्यांच्या खात्यातील थोडीफार रक्कम जरी या रस्त्याच्या कामांकरीता दिली असती तरी डोंगरकपारीत वसलेल्या या गांवाला रस्ता मिळू शकला असता.
परंतू पाटणकरांना तेवढेही करता आले नाही. ज्या पाटण विभागाला ते स्वत:चा बालेकिल्ला म्हणतात, त्या बालेकिल्ल्यातील अनेक गांवाना व वाड्यावस्त्यांना बारमाही रस्ता करणे त्यांना शक्य झाले नाही. आमदार म्हणून मी माईंगडेवाडीला दोनदा निधी मंजूर करुन दिला. आता तर कसणी पासून निगडे, माईंगडेवाडी पर्यंत रस्ता करण्याकरीता 3 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.गाव तिथे रस्ता आणि वाडी तिथे काम देण्याचे उदीष्ट आपण पुर्ण करीत आहोत. निवी पासून कसणी पर्यंतच्या एक कोटी रुपयांच्या रस्त्याचे आपण काही दिवसापुर्वीच भूमिपुजन केले. दिलेला शब्द पाळणाऱ्या नेतृत्वाला पाठींबा द्यायचा की केवळ निवडणूकीपुरते मते मागायला येणाऱ्यांना पाठींबा द्यायचा, याचाही विचार या विभागातील जनतेने करावा.
सातारा जिल्हा
मतदारसंघाचा विकास साधायला पाटणकर कमीच पडले
आमदार शंभूराज देसाई यांचा पाटणकरांना टोला


