फलटण – सातारा येथील चारभिंती परिसरात बांधकाम प्रकल्पामध्ये भागिदारी देतो, असे सांगून फलटणमधील एका युवकाकडून भागिदारीपोटी तब्बल 15 लाख रुपये घेवून त्या युवकाला भागिदारीत न घेता परस्पर फ्लॅटची विक्री केली. याबाबत संबंधित युवकाने विचारणा केली असता त्याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी फलटण येथे गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र संबंधित डॉक्टर दांम्पत्याला फलटण शहर पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप होत असल्याने फिर्यादी युवकासह त्यांचे कुटूंब दहशतीच्या छायेखाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा येथील डॉ. प्रशांत चंद्रकांत काळे व त्यांची पत्नी डॉ. अनुजा प्रशांत काळे यांचा चारभिंती परिसरात बांधकाम प्रकल्प सुरु होता. यावेळी एका मध्यस्थीच्या मदतीने डॉ काळे दाम्पत्याने सातारा येथील बांधकाम प्रकल्पासाठी आम्हाला भागिदार हवा आहे, असे सांगितले होते. त्यानुसार फलटण येथील पंकज आटपाडकर याने त्यांचा मित्र सिद्धार्थ सुभाष काकडे, रा. मंगळवार पेठ, फलटण याच्याशी संपर्क साधला. त्यानुसार सिद्धार्थ काकडे याने 13 डिसेंबर 2013 रोजी काळे दाम्पत्याबरोबर करारनामा केला. करारपत्रानुसार सिद्धार्थ काकडे याने काळे दांम्पत्याच्या बांधकाम प्रकल्पामध्ये 15 लाख रुपये गुंतवले होते. करारपत्रानुसार 33.33 टक्के निव्वळ नफा व 15 महिन्यानंतर 15 लाख रुपये डॉ काळे यांनी सिद्धार्थ काकडे यांना परत देण्याचे ठरले होते. तसेच बांधकाम प्रकल्पातील फ्लॅटच्या विक्रीबाबतच्या सहीचा अधिकारदेखील काकडे यांना देण्याचे ठरले होते.
करारपत्रानुसार काकडे यांनी 2013-14 मध्ये बांधकाम साहित्य व बँकेच्या माध्यमातून रोख रक्कम असे मिळून 15 लाख रुपये डॉ काळे दांम्पत्याला दिलेले होते. संबंधित रकमेची पावतीही काळे दांम्पत्याने काकडे यांना दिलेली होती. मात्र, पैसे मिळाल्यानंतर काही दिवसांतच करारपत्राचा भंग करुन काळे दांम्पत्याने बांधकाम प्रकल्पामधील अनेक फ्लॅटची परस्पर विक्री केली असल्याचे फिर्यादी सिद्धार्थ काकडे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काकडे यांनी काळे दांम्पत्यास जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत नोटबंदीचे कारण पुढे करुन तसेच रेरा नियमांतर्गत पैसे भरायचे आहेत, असे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्याचप्रमाणे कराराप्रमाणे भागिदारीतील निव्वळ नफाही काकडे यांना दिला नाही. ऑक्टोबर 2018 मध्ये काकडे यांनी काळे दांम्पत्याच्या सातारा येथील घरी जावून रकमेची मागणी केली. यावेळी काळे दांम्पत्याने काकडे यांना अपमानास्पद वागणूक देवून तुला बघून घेतो, तुला आम्ही पैसे परत देणार नाही, असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तुझ्याच विरोधात छेडछाडीची तक्रार करु, अशी धमकी काळे दांम्पत्याने काकडे यांना दिली. याप्रकरणी दि. 28 जून 2019 रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात काकडे यांनी अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा (ऍट्रोसिटी) अंतर्गत, तसेच फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. मात्र 19 दिवस उलटूनही फलटण शहर पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. उलट, डॉ. काळे दांम्पत्यालाच फलटण शहर पोलीस अभय देत असल्याचा आरोप सिद्धार्थ काकडे यांनी केलेला आहे.
डॉक्टर प्रशांत काळे व त्याची पत्नी अनुजा काळे यांनी भागिदारी देतो असे अमिष दाखवून अनेकांना टोप्या घातलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी कोळकी, ता. फलटण येथील प्राथमिक शिक्षक असलेल्या अविनाश शिंदे यांना गंडा घालून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. एकूणच डॉ. काळे दांम्पत्याने अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.
सातारा जिल्हा
डॉक्टर दांम्पत्याचा फलटणमधील युवकाला लाखोंचा गंडा


