सातारा : माजी राज्यपाल जी.डी.तपासे मार्गावरील छत्रपती शिवाजी संग्रहालय आणि परिसर घाणीच्या विळख्यात अडकल्याने या भागात प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. याची दखल घेत नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबवत लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती नगरसेविका सिता हादगे यांनी दिली. यावेळी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, माजी शिक्षण सभापती राम हादगे, नगरसेवक बाळासाहेब खंदारे, मूकनायक फाऊंडेशनचे ओमकार तपासे, राजू जेधे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी संग्रहालयालगत कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मंडई, हॉकर्स, सेव्हेनस्टार संकुलातील व्यापारी कचरा टाकत असल्याने एसटी स्टँडला जाणारे प्रवाशी आणि चाकरमाने दुर्गंधीच्या त्रासाला कंटाळले होते. लगत असणाऱ्या माजी राज्यपाल जी.डी.तपासे यांच्या नावाच्या फलकाखाली मोठ्या प्रमाणात कचरा पडत असल्याने या परिसराचे विद्रुपीकरण झाले होते. म्हणून सिता हादगे यांनी लोकसहभागातून परिसराची संपूर्ण स्वच्छता करत वृक्षारोपण केले. यावेळी नगराध्यक्षा कदम यांनी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आरोग्य निरीक्षक प्रविण साबळे यांना दिले. तसेच लोकांच्या सहभागातून अल्पावधीत राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. अशाच प्रकारे शहरातील इतर ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याची स्तुत्य संकल्पना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेवटी नगराध्यक्षा कदम यांनी जाहीर केले. यावेळी बाळासाहेब शिरसाट, मनोजकुमार तपासे, बापू सोनमळे, यतीराज कदम, अनिकेत तपासे, संतोष माने, संजय पवार, राजकुमार पाटील, संतोष कांबळे आणि नागरिक उपस्थित होते.
पोलिसदादांनी मानले आभार......
या परिसरात वाहतुकीचा ताण सातत्याने असल्याने दुर्गंधीच्या विळख्यात पोलिसांना कर्तव्य बजवावे लागत असून स्वच्छता करत वृक्षारोपण केल्याने उपस्थित पोलिसांनी उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.
सातारा जिल्हा
छत्रपती शिवाजी संग्रहालय परिसरात वृक्षारोपण
लोकसहभागातून परिसराची स्वच्छता : सिता हादगे


