सातारा, दि.१९- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आलेले पुरुषोत्तम जाधव यांची उमेदवारी अद्याप पक्षाने जाहीर केलेली नाही, तर भाजपकडून साताऱ्यासाठी शिवसेनेची मनधरणी सुरूच आहे.
या परिस्थितीत साताऱ्यातून माथाडी नेते नरेंद्र पाटील हेच उदयनराजेंना टक्कर देऊ शकतात, अशी वातावरण निर्मिती झाल्यामुळे साताऱ्यात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. सध्यातरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सातारा मतदारसंघाबाबत अद्याप अंतिम चर्चा झालेली नाही. त्यामुळे साताऱ्यासाठी युतीचा ‘वेट ॲण्ड वॉच’चा फॉर्म्युला सध्यातरी आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे त्यांनी भाजपचे नेते पुरुषोत्तम जाधव यांना पक्षात घेतले आहे. त्यांची उमेदवारी येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे; पण अद्यापतरी पुरुषोत्तम जाधव यांचे नाव ‘वेटिंग’मध्ये आहे, तर दुसरीकडे आजपर्यंत तरी सातारा मतदारसंघासाठी भाजपकडून जोराचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आग्रही आहेत. त्यांना सातारा मतदारसंघ भाजपकडे घेऊन येथून माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांना उदयनराजेंच्या विरोधात रिंगणात आणायचे आहे. तसे झाले तर उदयनराजेंना निवडणूक अडचणीची ठरणार आहे. हे ओळखून उदयनराजेंच्या काही समर्थकांकडून युतीकडून हालका फुलका उमेदवार दिला जावा, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
लोकसभा निवडणूक लढण्याच्या हेतूनचे पुरुषोत्तम जाधव हे शिवसेनेत गेले आहेत; पण त्यांची उमेदवारी सेनेने जाहीर केलेली नाही. त्यामुळे भाजपने आणखी जोर लावून साताऱ्यासाठी शिवसेनेची मनधरणी सुरूच ठेवली आहे. दुसरीकडे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनाही साताऱ्यातून भाजपकडून त्यांचेच नाव जाहीर केले जाईल, अशी आशा आहे. त्यादृष्टीने ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. आता सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अंतिम चर्चा येत्या दोन- तीन दिवसांत होणार आहे.
त्यामध्ये नेमका उमेदवार कोण हे निश्चित होईल. त्यामुळे नरेंद्र पाटील असो किंवा पुरुषोत्तम जाधव असो... दोघांनाही आपल्या नेत्यांच्या बैठकीतील निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.
राजकीय
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पुरुषोत्तम जाधव अजून ‘वेटिंग’वर!


