सातारा, दि. ७ – शेतजमिनीची फसवणूक केल्याप्रकरणी कराड येथील दोन खासगी सावकारांवर सहा महिन्यांपुर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्यासह कराड तालुक्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांवर मोक्कांतर्गत कारवाई करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. असा इशारा भीमशक्ती संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. हिंगनोळे, ता. कराड येथील मधूकर आबा सुपनेकर या शेतकऱ्याची सागर उत्तम नलवडे व सातुल्या सुर्यवंशी रा.कराड यांनी शेतजमीनीची फसवूणक केली.
या प्रकरणी सुपनेकर यांनी 15 सप्टेंबर 2018 रोजी फिर्याद देवून व दोघांवर गुन्हा दाखल होवून देखील अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. असे प्रकारे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाले. त्या ठिकाणी कठोर भूमिका घेवून कारवाई करण्यात आली. मात्र, त्यातून कराड तालुकाच का सुटला? हा प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस प्रशासनाने योग्य भूमिका न घेतल्यामुळे कराड तालुक्यातील गुन्हेगार मोकाट आहेत व अद्याप गोरगरिब शेतकऱ्यांवर अन्याय हे सुरूच आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कुटुंबांना आधार देण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब शिरसट, गुलाब बनसोडे, अरूण पवार, मधूकर सुपनेकर आदी उपस्थित होते.
दैनिक प्रभातवरुन
सातारा जिल्हा
कराडातील सावकारांना मोक्का लावा
अन्यथा आमरण उपोषण, भीमशक्ती संघटनेचा इशारा


