NEWS & EVENTS

राजकीय

आडवाणींना जोडे मारून हाकललं, राहुल गांधीचा मोदींवर गंभीर आरोप

गुरूला न मानणारे मोदी हिंदू धर्माच्या गोष्टी करतात अशीही टीका राहुल गांधींनी केली

63Rahul-Advani-Modi.jpg

चंद्रपूर, दि.5- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु लालकृष्ण आडवाणी आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा अजिबात आदर राखत नाहीत. साधं त्यांच्यापुढे वाकतही नाहीत. मला आठवतंय एका कार्यक्रमात आडवाणींना नरेंद्र मोदींनी जोडे मारून हाकललं होतं असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. चंद्रपुरात झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी हा आरोप केला आहे. भाजपात ज्येष्ठांचा मान ठेवण्याची प्रथा नाही असे सांगत त्यांनी हे उदाहरण दिलं आहे. तसेच स्वतःच्या गुरूचा आदर न करणारा माणूस हिंदू धर्माच्या गोष्टी करत असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. हिंदू धर्मात गुरु शिष्य परंपरा आहे. गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे, मोदींचे गुरु आडवाणी आहेत. मात्र शिष्य गुरुसमोर हात जोडत नाहीच शिवाय एकदा तर त्यांना मोदींनी जोडे मारून हाकललं असा आरोप राहुल गांधींनी केला.

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण यांनी गुरूवारीच एक ब्लॉग लिहिला होता. या ब्लॉगमध्ये त्यांनी भाजपाची भूमिका काय आहे ते मांडले होते. तसेच निवडणुका या लोकशाहीचा उत्सव असून त्या निष्पक्षपातीपणाने पार पडल्या पाहिजेत असे म्हटले होते. लालकृष्ण आडवाणी यांना तिकिट नाकारण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ब्लॉग मधून गांधीनगर मतदारसंघातील मतदारांचेही आभार मानले आहेत. मात्र आज राहुल गांधी यांनी यासंदर्भात बोलताना लालकृष्ण आडवाणी हे मोदींचे गुरू असूनही मोदींनी त्यांचा कायम अपमान केला आणि त्यांचा अनादर केला असा गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाही तर लालकृष्ण आडवाणींना एका कार्यक्रमातून जोडे मारून हाकलण्यात आले होते असाही गंभीर आरोप राहुल गांधी यांनी चंद्रपुरातल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला. या आरोपाला भाजपानेही उत्तर दिले आहे. खोटं बोल पण रेटून बोल हे राहुल गांधींचे धोरण आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत अपशब्द बोलणाऱ्या राहुल गांधींनी आम्हाला गुरु शिष्याचं नातं काय आहे ते सांगू नये असे म्हटले आहे.

दरम्यान आज केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी राफेल करार, गरीबी, बेरोजगारी या मुद्द्यांवरूनही सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नाही तर श्रीमंत उद्योजकांचे चौकीदार आहेत असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. १५ निवडक उद्योजकांचे कर्ज माफ करण्यास या सरकारकडे पैसा आहे मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे पैसे नाहीत असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.