NEWS & EVENTS

राजकीय

राहुल गांधींनी सांगितलं प्रियंका गांधींच्या राखीबद्दलचं ‘हे’ गुपित

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करतात

72Rahul-Priyanka-Gandhi.jpg

पुणे, दि.5- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करतात. पुण्यातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबद्दल सांगितलं. राहुल गांधी यांनी सांगितलं की, जोपर्यंत राखी तुटत नाही तोपर्यंत मी राखी काढत नाही. यावेळी त्यांनी आपल्या हातातील राखीदेखील दाखवली. ही राखी पुढील रक्षाबंधनापर्यंत आपल्या हातात असेल असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी राहुल गांधी यांनी प्रियंका गांधींसोबत असणाऱ्या आपल्या नात्यावरही भाष्य केलं. राहुल गांधी यांनी पुण्यात हडपसरच्या मगरपट्टा सिटी येथे तरुणांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी पाच हजार महाविद्यालीयन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.

‘प्रियंका आणि मी चांगले मित्र आहोत. माझ्यात आणि प्रियंकात भांडण अजिबात होत नाही, आधी आम्ही खूप भांडायचो. गोड खायला घालून मला जाडं बनवण्याचा प्रयत्न ती सतत करत असते’, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. लहान असल्यापासून मी खूप हिंसा पाहिली आहे. माझ्या त्या प्रवासात बहिण माझ्यासोबत होती. भांडण झालं तर आमच्यापैकी एकजण नेहमी माघार घेत असे असंही त्यांनी सांगितलं.

राहुल गांधी यांनी आपलं नरेंद्र मोदींवर प्रचंड प्रेम असल्याचं म्हटलं आहे. पण याचवेळी त्यांनी एक खंतही व्यक्त केली. माझं नरेंद्र मोदींवर प्रचंड प्रेम आहे, माझा त्यांच्यावर अजिबात राग नाही, पण त्यांचा माझ्यावर राग आहे असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींचं नाव घेताच यावेळी हॉलमध्ये मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी राजकारणात निवृत्ती असली पाहिजे का? असा प्रश्न विचारला असता आपण त्याच्याशी सहमत असल्याचं सांगितलं. वयाच्या ६० व्या वर्षी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. सुबोध भावे यांनी जेव्हा संवाद साधण्यास खूप हिंमत लागते असं विचारलं असता राहुल गांधींनी सांगितलं की, ‘अनुभवातून हिंमत आली. जे सत्य आहे ते स्विकारलं. सत्यातून हिंमत येते. जर खोटं स्विकारलं तर भीती निर्माण होते. सत्य कधी कडवं असतं पण ते स्विकारावं लागतं’. पुढे बोलताना जर एखादी गोष्ट कऱण्याचा निर्णय मी घेतला तर त्याचे काही परिणाम असले तरी मी ते पूर्ण करतो असं सांगितलं.

आम्ही अनेकांशी संवाद साधून त्याचं म्हणणं जाणून घेतलं आणि त्यानंतर जाहीरनामा तयार केला. ७२ हजारांची कल्पनाही मला लोकांशी बोलल्यानंतर सुचली अशी माहिती राहुल गांधींनी दिली. जे शक्य आहे तेच मी बोलतो. मला उगाच हवेत बोलायला आवडत नाही असंही त्यानी म्हटलं.

रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना भारत रोज २४ हजार नोकऱ्या गमावत आहे, आपल्या देशात कौशल्याचा आदर केला जात नाही अशी खंत राहुल गांधींनी व्यक्त केली. ‘तुम्ही ७२ हजार रुपये कसे उभारणार विचारलं असता तुम्ही नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्याबद्दल ऐकलं आहे का अशी राहुल गांधींची विचारणा केली. ७२ हजार रुपये देण्यासाठी आयकर वाढवला जाणार नाही याची हमी मी देतो, सर्वसामान्यांना कोणताही फटका बसणार नाही असंही ते म्हणाले.

एअर स्ट्राइकसंबंधी बोलताना त्याचं सर्व श्रेय हवाई दलाचं आहे. एअर स्ट्राइकचं राजकारण करण्याच्या विरोधात मी आहे, मला त्याचं राजकारण करायचं नाही. पंतप्रधान जेव्हा अशा गोष्टींचं राजकारण करतात तेव्हा मला वाईट वाटतं असं राहुल गांधींनी म्हटलं. ज्याप्रमाणे मी संवाद साधत आहे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी संवाद का साधत नाहीत ? असा प्रश्नही यावेळी राहुल गांधींनी विचारला. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात जितकी गुतंवणूक केली पाहिजे तितकी सरकार करताना दिसत नाही, आम्ही सत्तेत आल्यास ते करु असं आश्वासन यावेळी राहुल गांधींनी दिलं.