मुंबई, दि.19- राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने अर्थात सुजय विखे पाटील यांनी भाजपाची वाट धरताच काँग्रेसला धक्का बसला होता. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे कारण माढाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाने अर्थात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील हे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला हे मोठे खिंडार मानले जाते आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे असंही स्पष्ट होतंय. त्यामुळे आता काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीलाही खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बुधवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील , गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. पण, विजयसिंह मोहिते – पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहेत. डॉ. सुजय विखे – पाटील यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मोठा धक्का बसणार आहे. डॉ. सुजय विखे यांच्या प्रवेशानंतर आणखी बरेच जण लाईनमध्ये असल्याचं विधान गिरीश महाजन यांनी केलं होतं त्याचाच प्रत्यय आज आला आहे.
माढा येथून शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार असं सुरुवातीला जाहीर करण्यात आलं होतं. मात्र तिथून त्यांनी माघार घेतली. आता त्याच ठिकाणी भाजपा रणजितसिंह मोहिते पाटील यांना तिकिट देऊ शकते अशी शक्यता आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांनी मुलाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.
राजकीय
रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार, राष्ट्रवादीला धक्का
काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीला खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे


