सातारा : सातारचे मंजूर असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरीता, सध्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सिव्हील हॉस्पिटल व सिव्हील हॉस्पिटलचा जागा परिसर, राज्याच्या वेद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करणे अनेक दिवस प्रलंबीत होते, तथापि आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, वैद्यकीय महाविद्यालयाकरीता सातारचे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून, वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यास राज्यशासनाने आजच मंजूरी दिली आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधुन, वैद्यकीय अभ्यासक्रम सुरु करण्यातील एक महत्वाचा व क्लिष्ट प्रक्रीया असलेला टप्पा पार पडला आहे. ही जटील प्रक्रीया सातारा जिल्हावासियांच्या जनइच्छेनुसार घडली आहे याचे समाधान आहे अशी भावनिक प्रतिक्रीया सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केली आहे.
याबाबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, सातारचे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणेकरीता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषाप्रमाणे ५०० खाटांचे रुग्णालय असणे आवश्यक आहे. सातारच्या स्व.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांच्या खाटांची संख्या कमी असल्याने, वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणेकरीता, जिल्हा रुग्णालयास स्वतंत्र १०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर करुन घेण्यात आले होते. त्यानंतर पुढे सरकलेला वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव जागेकरीता प्रलंबीत होता. त्यावेळी प्रथम खावली येथील जागा निवडण्यात आली, तथापि सदरची जागा गैरसोयीची ठरणार असल्याचे लक्षात आल्यावर, कृष्णा खोरे विकास महामंडळाची, कृष्णानगर येथील जागा निश्चित करण्यात आली. त्यानंतर ब-याच प्रयत्नांनंतर सदरची जागा वैद्यकिय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे जागेचा प्रश्न सुटला. मंजूर वैद्यकीय महाविद्यालय, सातारच्या जिल्हा रुग्णालयाशी संलग्न केले असल्याने, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असलेले जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरीता, वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा महत्वाचा टप्पा राहीला होता, त्याकरीता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरिश महाजन, तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, यांच्याकडे आम्ही तगादा लावला होता. सातारच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा व पात्रता असणा-या विद्यार्थ्यांची, सातारा येथे लवकरात लवकर नवीन संधी व सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीकोनामधुन, आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरुच होते. त्याच प्रयत्नांना भाग म्हणून आजच राज्यशासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असणारे स्व.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे, हस्तांतरीत करण्यास नियमानुसार अटी-शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे.
यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरीता आवश्यक असणारे अधिष्ठाता अर्थात डिन या पदावर डॉ.मुरलीधर तांबे, तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर म्हणून डॉ.प्रकाश गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाकरीता आवश्यक असणारा स्टाफ नव्याने किंवा प्रतिनियुक्तीने घेण्यास मान्यता घेण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही जलद करण्यात येईल. सन २०२० सालचे नीट परिक्षेब्दारे सुनिश्चित होणारे वैद्यकीय प्रवेशाकरीता, सातारचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुपाने नवीन व जादा संधी, निर्माण होण्याकरीता आमचेकडून सर्वतो प्रयत्न करण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रक्रीयेत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरिश महाजन, यांचेसह, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे, सिव्हील सर्जन डॉ.आमोद गड्डीकर, महाविद्यालयाचे डिन डॉ. मुरलीधर तांबे, नोडल ऑफीसर, डॉ.गुरव, डॉ.संजय गायकवाड, वर्ग-१ चे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजोग कदम,आमचे मित्र डॉ.चंद्रशेखर घोरपडे, जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, मिशन हॉस्पिटल बाईचे विश्वस्त रॉबर्ट मोझेस, आदींचे महत्वपूर्ण योगदान आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात शेवटी नमुद केले आहे.
राजकीय
सातारा सिव्हील हॉस्पिटल, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून, वैद्यकीय शिक्षण विभागाकडे
खा. उदयनराजेंची माहीती


