सातारा : संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा| पुनरपी संसारा येणे नाही॥ साधुसंतांनी मनाच्या, चित्ताच्या स्वच्छतेबाबत आपल्या अभंगातून जागृती केली आहे. आयुष्य सुफल व्हायचे असेल तर मन, काया आणि आपला परिसरही तेवढाच स्वच्छ राखला पाहीजे. हाच तर आपल्या जगण्याचा सुखी मार्ग.... हेच ध्येय ठेवून सातारा जिल्हा प्रशासनाने स्वच्छतेचा जागर केला. जनतेनी त्याला चळवळीचे रूप दिले.... बघता बघता जिल्ह्याचे रूप पालटले... आणि देशातील सर्व जिल्ह्यतून केंद्र सरकारने साताऱ्याचा दिल्लीत गौरव केला. तो गौरव सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचा आहे. छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या जिल्ह्याने अनेक क्षेत्रात आपल्या कार्याचा राष्ट्रीय ठसा उमटवलेला आहे. त्याला स्वच्छतेच्या राष्ट्रीय गौरवाने मोहर उमटवली आहे.... या स्वच्छतेच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा... !!
शौचालयाचे जिओ टँगिंग
स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेचा कालावधीत 1 ते 31 जानेवारी 2019 असा होता. या स्पर्धेचा उद्देश प्रत्येक कुटूंबाचे वैयक्तिक शौचालय नव्याने रंगरंगोटी करुन स्वच्छतेचा संदेश देणे हा होता. या उद्देशाने या स्पर्धेसाठी पेंटर व कलाशिक्षक व तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. तसेच ग्रामीण भागातील कुटुंबांना गृहभेटी देऊन स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेची जनजागृती करुन तालुकास्तरीय स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ग्रामपंचायतीतील सर्व कुटुंबाची शौलचालय रंगविणे 30 गुण, शाळा, अंगणवाडीतील सार्वजनिक शौचालय रंगविणे 20 गुण, गावस्तरावरील सर्व उपकेंद्र, बसस्थानक व धार्मिक ठिकाणांचे शौचालय रंगविणे 20 गुण व लोकसभागातून शौचालय रंगविणे 10 गुण असे गुणक्रम ठरवून देण्यात आले होते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या 1 हजार 490 असून या स्पर्धेमध्ये 1 हजार 759 गावांनी सहभाग नोंदविला होता. ग्रामीण भागातील शौचालयाची संख्या 4 लाख 80 हजार 870 असून त्यापैकी 4 लाख 18 हजार 241 शौचालय या स्पर्धेसाठी रंगविण्यात आली होती.
स्वच्छता क्षेत्रात अग्रेसर असणा-या सातारा जिल्ह्याने स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत सक्रीय सहभाग घेवून उत्कृष्ठ कार्य करणा-या देशातील सात जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात विशेष पुरस्काराने जिल्ह्याला सन्मानीत करण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील एकूण 4 लाख 18 हजार 241 शौचालय रंगविण्यात आली होती, या कार्याची दखल म्हणून सातारा जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाने 1 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान देशभरातील 30 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे’ आयोजन केले होते. देशातील 614 जिल्ह्यांमधील 1 कोटी 32 लाख प्रतिस्पर्ध्यांनी यात भाग घेतला. या स्पर्धेच्या माध्यमातून शौचालयांना आकर्षकरित्या रंगविण्यात आले व या शौलालयांवर स्वच्छता जागृतीबद्दल संदेशही देण्यात आले. स्थानिक पातळीवर झालेल्या कामाची नोंद मंत्रालयाच्या जिओ टॅगींगवरुन देण्यात आली. या आधारावर मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांनी प्रत्यक्ष जिल्ह्यांना भेट देवून पाहणी केली होती.
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018 स्पर्धेत राज्यातील सातारा जिल्हयाने बाजी मारत देशात प्रथम क्रमांक पटकाविला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी एकूण 100 गुण ठरविण्यात आले. यात संख्यात्मक व गुणात्मक आधारावर सेवास्तर प्रगतीचे ३५ गुण व ग्रामस्थांच्या प्रतिसादाचे ३५ गुण व थेट परिक्षणाचे ३० गुण यांद्वारे अंतिम गुण ठरविण्यात आले.सर्व निकषांवर सातारा जिल्ह्याने देशात सर्वाधिक गुण मिळविले होते. स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत सातारा जिल्ह्याने आपला ठसा उमटविला आहे. सातारा जिल्हा परिषद केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे, यापुढे अग्रेसर राहण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे सांगतात.
विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेच्या’ विजेत्यांचा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार देवून सातारा जिल्हा परिषदेला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहकार्यामुळे मिळाला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे सांगतात. स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेसाठी फडतरवाडी ता. खटाव, मठाचीवाडी ता. फलटण, शिंदेवाडी ता. जावली, बनवडी ता. कराड, धनगरवाडी ता. खंडाळा व मान्याचीवाडी ता. पाटण या ग्रामपंचायतीतील शौचालयांचे छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठविण्यात आली होती. ग्रामपंचायतील शौचालयांवर ‘वेळ आहे काही तरी करायची, धरतीला वाचवायची’ ‘स्वच्छतेकी और एक कदम’, ‘नका करु परिसर घाण’, ‘नका घालवू तुमची शान’, ‘आरोग्याचे ठेवा भान’, ‘स्वच्छता म्हणजे रोजचा सण नाहीतर कायमचे आजारपण’, ‘स्वच्छता करा रोज घाणीचे प्रॉब्लेम क्लोज’, ‘ठेवू स्वच्छतेचे भान, देश बनवू जगात महान’ अशा प्रकारचे संदेश शौचालयांवर रंगविण्यात आले होते. शौचालय वापराबाबत जनजागृतीबरोबर स्वच्छतेचा संदेशही गेला, याचे खूप सकारात्मक परिणाम आज दिसत असून स्वच्छतेच्या संदेशाबरोबर शौचालय वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असले पाहिजे यासाठी पुढे प्रयत्न करणार असल्याचे सांगून श्री. शिंदे पुढे म्हणतात, ‘शौचालय वापराबाबत जनजागृतीसाठी जिल्ह्यात नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबतही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जोमाने काम सुरु आहे. तसेच यापुढे प्लॅस्टीक निर्मुलनावरही काम करणार आहे.’ पुढच्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यासाठी काम करणार आहे. यामध्ये महिलांच्या मासिकपाळीच्या वेळेस काय काळजी घ्यावी सॅनेटरी नॅपकींन वापराबाबत जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जनजागृती व सॅनेटरी नॅपकीनच्या विल्हेवाटाबाबत जनजागृतीवर भर देणार असल्याचे श्री. शिंदे सांगतात. यशाला अनेकांचा हातभार लागलेला असतो... ते यश कायम ठेवण्यासाठी ध्येयवेड्या लोकांची गरज असते... ते ध्येयवेड साताऱ्याच्या मातीतच आहे... हे अनेक वेळा सिद्ध झालं आहे. त्यामुळे स्वच्छतेची मोहर सातारकर जागतिक करतील आणि त्यात सातत्य राखतील अशी खात्री वाटते....!!
सातारा जिल्हा
साताऱ्याच्या स्वच्छतेची दिल्लीत गाज.... !!


