सातारा, दि. 6 – सातारा नगरपरिषदेच्या हद्दीत सध्या पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन कसरत करीत जावे लागत आहे. याचे कारण म्हणजे येथील निगरगट्ट व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेच्या आशिर्वादाने पदपथावर फरशी, टायर, कपडे आणि बऱ्याच काही वस्तू मांडल्याने हा पदपथ आहे का बाजारपेठ? असा प्रश्न सामान्य नागरिकास पडत आहे.
साताऱ्यातील पोवई नाका ते गोडोली मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोरच रजताद्री हॉटेलच्या शेजारी असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी कपडे, टायर, फरशी तसेच खाद्यपदार्थांचे टेबल आणि त्यांची दुचाकी वाहने बिनधास्त पार्किंग करुन सातारकरांच्या अडचणीत भर घातली आहे. या इमारतीमध्ये समाजाला दिशा देणारी अनेक कार्यालये आहेत. परंतु, सकाळी 10 ते रात्री 8.30 पर्यंत येथील पदपथावर नगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मर्जीने त्याचा वापर केला जातो. ही बाब अत्यंत गंभीर असून राजकीय नेत्यासाठी भांडणारी सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी आणि भाजपच्या नगरसेवकांना नेमका याचा विसर पडला आहे. सर्वच गोष्टी राजकीय नेत्यांवर अवलंबून नसतात. साताऱ्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत. परंतु अशा गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नसतो, ही बाब खटकत आहे.
सध्या परीक्षेचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या मार्गावर ये-जा करताना दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष द्यावे लागते. याठिकाणी अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. नो-पार्किंगच्या जागेत वाहन उभे केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई होते. परंतु राजरोसपणे पदपथाचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वाहतूक पोलीस यंत्रणा व सातारा नगर परिषदेचा अतिक्रमण विभाग केव्हा कारवाई करणार? याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. याबाबत जिल्हा अधिकारी श्वेता सिंघल व जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी लक्ष घालून संबंधित विभागाला कर्तव्याची जाणीव करुन द्यावी, अशी मागणी महिलावर्ग व विद्यार्थी संघटना करु लागल्या आहेत.
सातारा जिल्हा
साता-यात फुटपाथवर 'व्यापारी’राज


