सातारा, दि.7- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या बुथ कमिटीच्या बैठकीकडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पाठ फिरवली. पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी बुथ कमिट्यांच्या प्रतिनिधींशी या बैठकीत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुथ कमिटी अध्यक्ष व सदस्यांशी यावेळी संवाद साधण्यात येणार असल्याने राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील बहुतांश आमदार उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, सारंग पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सामिन्द्रा जाधव, जयश्री पाटील यांनी जय्यत तयारी केली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार बाळासाहेब पाटील यांनी कुणीही वैयक्तिक टीका-टिप्पणी करू नये, अशा सूचना केल्या.
खा. शरद पवार म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बुथ कमिटी सदस्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील मतदान केंद्रांवर मागील वेळी जो प्रकार झाला, तो सर्वांना माहित आहे. आता सर्व केंद्रांवर कार्यकर्त्यांनी दक्षता बाळगावी लागणार आहे. देशाला परिवर्तनाची गरज आहे. दरम्यान, यावेळी जिल्ह्यातून आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून खा. पवार यांनी प्रश्न जाणून घेतले. संतोष बर्गे (चिंचणेर), मधुकर निंबाळकर (कोंडवे), संतोष बाबर (किकली) यांनी यावेळी खा. पवार यांना प्रश्न विचारले. मराठा, धनगर आरक्षण, खतांचे वाढलेले दर, पाणीपुरवठा सहकारी संस्थांच्या अडचणी, वाढलेले वीजबिल यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. शासनाने सर्वच बाबतीत दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे संघटित राहून सरकारविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन खा. पवार यांनी यावेळी केले. तसेच वाई-खंडाळा-महाबळेश्वर, सातारा-जावळी, फलटण, कोरेगाव, पाटण, कराड उत्तर, कराड दक्षिण या विधानसभा मतदार संघातील कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीच्या बुथ कमिटींचे काम उत्तम असून, कराड दक्षिण व सातारामध्ये आणखी गतीने काम करावे लागणार असल्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केल्या.
राजकीय
खासदार उदयनराजे समर्थकांनी व्हिडीओ कॉन्फरन्सला फिरवली पाठ
राष्ट्रवादीच्या बुथ कमिटी अध्यक्षांची व्हिडीओ कॉन्फरन्स


