सातारा / प्रतिनिधी
नवीन पिढीतील कवींचा आणि अभिनेत्री, कवियत्री स्पृहा जोशी यांचा सहभाग असलेला 'नवकोरं' या कविता, गझल, गप्पांच्या कार्यक्रमात कलाकारांनी वैविध्यपूर्ण कविता सादर केल्याने त्याला सातारकरांची उत्स्फूर्त दाद मिळाली. निमित्त होत मसाप, शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपरिषद आयोजित मराठी भाषा पंधरवड्याच्या समारोपाचं.
अभिनेत्री, कवियत्री स्पृहा जोशी, आदित्य दवणे, संकेत म्हात्रे, प्रथमेश पाठक यांनी नवकोरं कार्यक्रम शाहू कलामंदिरमध्ये सादर केला. यामध्ये त्यांनी पारंपारिक कवीसंमेलनाची चौकट मोडत वेगळ्या पध्दतीने मैफल रंगवली. मला कविता का करावशी वाटली ? किंवा मी कवी कसा झालो ?, प्रेम कविता, सामाजिक आशय असणाऱ्या कविता, ज्येष्ठांच्या, मान्यवरांच्या त्यांना आवडलेल्या कविता सादर केल्याने एक परिपूर्ण काव्य मैफिलीची अनुभूती सातारकरांना मिळाली. कवितांबरोबर गप्पा मारत, गोष्टी सांगत उपस्थित सातारकरांना आपलसं करुन घेतलं. स्वत्व, निसर्ग, दैनंदिन जीवनातील प्रसंगाशी अनुरुप, समाजात घडणाऱ्या विविध घटना, त्याचे आयुष्यात उमटणारे पडसाद, सोशल मिडियाचा अतिरेक, राजकीय कार्यकर्त्यांची व्य्था, प्रेम, गझल अशा सर्वप्रकारच्या सर्वस्पर्शी कविता त्यांनी सादर केल्या . 'साडी खरेदी' या कवितेला श्रोत्यांनी चांगलीच दाद दिली. 'मग सगळेच शेअर करुया' ही सोशल मिडियावरील कविता सगळ्यांनाच अंतर्मुख करुन गेली. साताऱ्यातील प्रमोद कोपर्डे यांची 'मी काय मागतिल होत '?, सुरेश भट यांची 'अशावेळी लाजणं बरे नाही' ही गझल, बा.सी. मर्ढेकरांची 'आला आषाढ-श्रावण, आल्या पावसाच्या सरी', वि.दा.करंदीकरांची 'थोडी सुखी थोडी कष्टी' या कवितांना सातारकरांनी चांगला प्रतिसाद दिला. 'पाऊस आला गं आला गं आला' या सामूहिक कविता वाचनांने मैफिलीची सांगता झाली.
प्रारंभी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सातारकरांच्यावतीने अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, मसाप शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पत्रकार राजेश सोळस्कर, सुजित आंबेकर, ॲड. प्रमोद आडकर, किशोर बेडकिहाळ, डॉ.राजेंद्र माने, ॲड. चंद्रकांत बेबले उपस्थित होते. प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांनी मसाप, शाहुपुरी शाखेच्या कार्याचा आढावा घेत नुकतेच कविवर्य बा.सी.मर्ढेकर यांच्या घराचे नुतनीकरण केले असून लवकरच कवी यशवंत, कवी गिरीश, वसंत कानिटकर यांचे स्मारकही करणार असल्याचे सांगत अभिनेत्री स्पृहा जोशी यांचे कौतुक केले. ज्येष्ठ पत्रकार राजेश सोळस्कर म्हणाले, मसाप, शाहुपुरी शाखेने विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित करुन आणि नाविन्य पूर्ण उपक्रम राबवून शाहुपुरी हे नाव महाराष्ट्रात पोहचवले आहे. युवा पिढीने मराठी माध्यमाकडे यावे यासाठी विशेष लक्ष द्यावे लागेल. सातारा शहर आणि जिल्हयात मराठी भाषेसाठी कार्य करणारे अनेकजण आहेत त्यांना मसाप शाहुपुरी शाखेने प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करत विनोद कुलकर्णी यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी हरिष पाटणे, ॲड. प्रमोद आडकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मसाप शाहुपुरी शाखेचे कोषाध्यक्ष राजेश जोशी यांचा अभिनेत्री स्पृहा जोशी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले तर आभार अजित साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमाला शिरीष चिटणीस, डॉ, संदीप श्रोत्री, रवींद्र झुटींग, ॲड. मिलिंद ओक, बाबुराव शिंदे, वजीर नदाफ, अनिल जठार, तुषार महामुलकर, सचिन सावंत, सतीश घोरपडे, मसाप शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य आणि सातारकर रसिक उपस्थित होते.


