कराड, दि.२९- मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे माथाडी कामगार संघटनेची अनेक कामे घेऊन जात होतो. त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचा आमदार म्हणून सातत्याने दुय्यम वागणूक दिली. त्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडेही मी तक्रार केली होती. त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आघाडीला सोडचिठ्ठी द्यावी लागली, अशी माहिती सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, मनोज घोरपडे, पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुमच्यावर आयात उमेदवार आहे, अशी टीका केली आहे, त्यावर श्री. पाटील म्हणाले, ""जयंत पाटील मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलू? मात्र, त्यांनी केलेली टीका योग्य नाही. मी आयात उमेदवार आहे, की लोकांच्या मनातील उमेदवार आहे, ते तुम्हाला मतदानानंतर कळेल. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत ज्यांच्यासाठी मी जाहीर सभा घेतल्या आहेत. ते माझे सर्व मित्रही माझ्यासोबत आहेत. माथाडीचे नेतेही माझ्याच बाजूने आहेत. ही सगळी स्थिती मतदान झाल्यानंतर दिसेलच, त्याबाबत अधिक न बोलणे योग्य ठरेल.'' भाजपने राजकारणविरहित विकास विचार केला आहे. माथाडी कामगारांची अनेक कामे मार्गी लावली. वडाळा येथे घर बांधण्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लागतोय. त्याउलट सातारा लोकसभा मतदारसंघात काहीच कामे झालेली नाहीत, असे नमूद करून ते म्हणाले, ""दहा वर्षांत जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे. युनियनच्या माध्यमातून उद्योगांना त्रास दिला जात आहे. टोलनाक्यावरून भांडणे होतात. कोण- कुणाच्या बंगल्यात घुसतो, सोना अलाईज कंपनीत काय झाले? तुरुंगात कोण गेले? सगळी स्थिती जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनतेला आता नकोस झाले आहे. जिल्ह्याच्या समस्यांकडे विद्यमान खासदारांचे दुर्लक्ष आहे. त्यांच्या दहशतीतून जिल्हा मुक्त करायचा आहे. टोल नाक्यांवरील आर्थिक रसदीचा दुरुपयोग केला जात आहे. पुणे, सांगली व कोल्हापूरचा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीची अवस्था दयनीय आहे. उद्योजकांकडे खंडण्या मागितल्या जात आहेत.'' अनेक वर्षांपासून प्रलंबित वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्यसही प्राधान्य देणार आहे. पर्यटनातून उद्योगनिर्मिती, अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासह महिलांच्या सबलीकरणासाठीही आपण प्राधान्य देऊ, स्थानिक वाहनधारकांसाठी जिल्हा टोलमुक्त करेन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
माथाडी कामगार संघटना पाठीशी आहे. त्यांच्यातील एक माणूस लोकसभेत जाणार आहे. त्यामुळे त्यांचा एकमुखी पाठिंबा आहे. तेथे गेल्यास त्यांच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्यासही प्राधान्य देईन. मुख्यमंत्र्यांनी माथाडींच्या प्रश्नांबाबत नेहमीच सकारात्मकता दाखवली आहे. कॉंग्रेससह राष्ट्रवादीत अनेक मित्र असून, त्यांच्याकडून आपल्याला निश्चितपणे मदत मिळेल, असा दावाही त्यांनी केला.
कॉलर उडविणे तात्पुरती स्टाइल
युवकांना आकर्षित करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले कॉलर उडवतात. ती त्यांची स्टाइल आहे, तुमची काय स्टाइल आहे का, या प्रश्नावर नरेंद्र पाटील म्हणाले, ""माझी स्टाइल काहीच नाही. ती सवयही नाही. कॉलर उडवायची स्टाइल तात्पुरती आहे. ती थांबवून लोकांमध्ये राहून कायमस्वरूपाचे काम करायचे आहे.''
राजकीय
पृथ्वीराजबाबांकडून दुय्यम वागणूक - नरेंद्र पाटील


