सातारा,दि.२५ - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांचे पुण्यात आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले. सातारच्या पुरोगामी चळवळीत विद्यार्थीदशेपासून कार्यरत असलेले किशोर माधवराव तपासे वय-६३ यांचे आजाराने पुणे येथील दिनानाथ रुग्णालयात निधन झाले.
दिवंगत कवी, साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या ‘दलित पँथर’ पासून ते दलित चळवळीशी जोडले गेले होते. सातारा जिल्ह्यातील दलित चळवळीचा चेहरा म्हणून ते ओळखले जात होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापनेपासून ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत कार्यरत होते. रामदास आठवले यांनी त्यांची रिपाइंच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली होती. सातारा जिल्ह्यात रिपाइं हा पक्ष वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. चळवळी बरोबरच ते आयुर्विमा महामंडळात ते नोकरीस होते.
सातारा शहरात त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. लोक त्यांना ‘भाऊ’ या नावाने ओळखायचे. ते जरी स्वत: निवडणूक लढले नाहीत, तरी त्यांनी सातारा पालिकेत स्वत:च्या ताकदीवर ६ नगरसेवक निवडून आणण्याची किमया केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.
राजकीय
रिपाइंचे ज्येष्ठ नेते किशोरभाऊ तपासे यांचे निधन
सातारच्या पुरोगामी चळवळीतील नेता हरपला


