NEWS & EVENTS

व्यवसाय

‘सेन्सेक्स’ची आगेकूच कायम; ८५ अंशांची नव्याने भर

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८५.२६ अंशांनी वधारून ६१,२३५.३० पातळीवर बंद झाला.

84s-m.jpg

मुंबई : जागतिक पातळीवर नकारात्मक संकेत असूनही त्याकडे दुर्लक्ष करत देशांतर्गत पातळीवर गुरुवारी सलग पाचव्या सत्रात निर्देशांक तेजीसह स्थिरावले. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या इन्फोसिस, टाटा स्टील आणि लार्सन अँड टुब्रोच्या समभागांमध्ये खरेदीचा जोर राहिल्याने सेन्सेक्समध्ये ८५ अंशांची भर पडली.


दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८५.२६ अंशांनी वधारून ६१,२३५.३० पातळीवर बंद झाला. सकाळच्या सत्रात सुरुवात घसरणीसह करणाऱ्या सेन्सेक्सने ६१,००० अंशांची पातळीही तोडली होती आणि ६०,९४९.८१ हा त्याचा दिवसातील तळ होता. माध्यान्हानंतर मात्र खरेदी वाढल्याने निर्देशांक सावरताना दिसला. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४५.४५ अंशांची भर पडली आणि तो १८,२५७.८० पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. अमेरिकेतील ४० वर्षांतील उच्चांकी स्तर गाठलेला महागाई दर, त्या उलट चीनच्या मध्यवर्ती बँकेने डिसेंबर महिन्यात व्याजदरात अपेक्षेहून अधिक घट केल्याने आशियातील भांडवली बाजाराची सुरुवात नकारात्मक राहिली. त्याचेच पडसाद भारतीय भांडवली बाजारावर उमटले. परिणामी सकाळच्या सत्रात देशांतर्गत भांडवली बाजाराची सुरुवात धीम्या गतीने आणि प्रसंगी नकारात्मक राहिली. मात्र दुपारच्या सत्रात बाजार सकारात्मक पातळीवर टिकून राहिला, असे निरीक्षण आनंद राठी दलाली पेढीचे संशोधन प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी नोंदविले.


 


सौजन्य - लोकसत्ता ऑनलाईन