मुंबई, दि. ८ - विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही, अशी भूमिका नितीन गडकरींनी आता मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मांडली आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची कावकाव कोणी करीत असेल तर गडकरी म्हणतात त्याप्रमाणे त्यांना ठोकूनच काढायला हवे. या बदलासाठी अखंड महाराष्ट्राने नितीन गडकरींचे जाहीर अभिनंदन केलेच पाहिजे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणादरम्यान विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करत पत्रके सभास्थळी फेकल्याचा प्रकार बुधवारी संध्याकाळी घडला होता. विदर्भवाद्यांच्या घोषणाबाजीमुळे संतापलेल्या गडकरींनी ‘शांत बसत नसतील तर त्यांना ठोकून काढा’, असे निर्देशच पोलिसांना दिले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले.
“नितीन गडकरी यांचे आम्ही खास अभिनंदन करत आहोत. स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरज नाही. विकास व्हावा म्हणून स्वतंत्र विदर्भाची मागणी होती. आता विकासाचा वेग वाढला आहे. त्यामुळे वेगळा विदर्भ मागणे बरोबर नसल्याचे गडकरी यांनी ठणकावून सांगितले आहे. ही ठोकाठोक महाराष्ट्रहिताचीच असल्याने ठोकाठोकीमुळे कायदा-सुव्यवस्थेलाही ठोकले काय, असले प्रश्न निरर्थक आहेत. विकास हाच राज्यकारभाराचा पाया असतो. त्या विकासाला विदर्भात चांगलीच गती मिळाली आहे”, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.
“रखडलेल्या विकासाचा विदर्भातील त्या-त्या वेळी अडगळीत पडलेल्या नेत्यांनी कायमच राजकीय हत्यारासारखा वापर केला आणि त्यांनीच वेगळ्या विदर्भाचा किडा अधूनमधून वळवळत ठेवला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला व्यापक जनसमर्थन कधीच मिळाले नाही. तसे असते तर संयुक्त महाराष्ट्राचा नारा बुलंद करणाऱ्या शिवसेनेचे चार-चार खासदार वैदर्भीय जनतेने कधीच निवडून दिले नसते. वेगळ्या विदर्भाची टूम मूठभर नेत्यांची होती हे अनेकदा सिद्ध झाले”, असा दावाही अग्रलेखात करण्यात आला आहे.
राजकीय
गडकरींचे अभिनंदन केलेच पाहिजे: शिवसेना


