सातारा, दि.२७- सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी रंगतदार प्रसंग घडला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाढत गेलेले वितुष्ट अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या साक्षीने मिटले. दोन्ही राजांची जाहीर गळाभेट झाली. शिवेंद्रराजेंनी आपल्या भाषणात डायलॉगबाजी करताना ‘जो मैं बोलता हूँ ओ मैं करता हूँ, जो मैं नही बोलता हूँ ओ डेफिनेटली करता हूँ’ अशी संवादफेक केली तर शिवेंद्रराजेंची व माझी टॉम अँड जेरीची जोडी आहे, तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशी आमची अवस्था असल्याची मिश्किली खा. उदयनराजे भोसले यांनी केली व भविष्यात आम्ही कायमस्वरूपी एकत्र राहू, असा शब्द दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा- जावली तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा येथील कल्याण रिसॉर्टमध्ये पार पडला. मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. उदयनराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, जि.प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, ऋषिकांत शिंदे, तेजस शिंदे, सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. जयंत पाटील म्हणाले, उदयनराजेंना सगळ्या महाराष्ट्रातून मागणी आहे. आज दोन्ही राजांचे पुन्हा मनोमीलन झाले आहे ही महाराष्ट्रासाठी चांगली नांदी आहे. शिवेंद्रराजेंनी अंबांनीबंधूंची उपमा दिली आहे. एक बंधू संकटात असताना दुसरा धावून गेला असे शिवेंद्रराजेंना सुचवायचे असावे. उदयनराजे, तुम्ही आता निवडून आला आहात. लोकसभेनंतर तुमची जबाबदारी जास्त आहे. तुमच्यापेक्षा शिवेंद्रराजेंवर माझे जास्त प्रेम आहे. ते वयाने लहान आहेत. शिवाय राजारामबापू पाटील यांनी भाऊसाहेब महाराजांवर प्रेम केले होते, त्यांना राजकारणात आणले होते. तसेच माझे शिवेंद्रराजेंच्याबाबतीत आहे. त्यामुळे तुमची निवडणूक झाल्यावर शिवेंद्रराजेंवर तुमचे लक्ष असले पाहिजे हे पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझे तुम्हाला सांगणे आहे.
अण्णासाहेब पाटील यांच्या मिशांचा पिळ काय होता? आता तो पिळ राहिला नाही. कारण अण्णासाहेबांकडे स्वाभिमान होता. मात्र, विरोधी उमेदवार एका झटक्यात तीन पक्षात फिरत आहेत. माथाडी कामगारांचा कायदा मोडीत काढण्याचे कारस्थान भाजप-सेना सरकारचे आहे. त्यामुळे माथाडी कामगारांनी भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही आ. जयंत पाटील यांनी केले.
खा. उदयनराजे म्हणाले, कुणी आम्हाला राम-लक्ष्मण म्हणाले, कुणी श्रीकृष्ण म्हणाले, कुणी अंबानी म्हणाले, पण शिवेंद्रराजेंची व माझी जोडी टॉॅम अॅण्ड जेरीची आहे. तुझ्या वाचून जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना, अशी आमची अवस्था आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी ज्या भावना मांडल्या आहेत. त्यानुसार भविष्यकाळात आमची वाटचाल राहिल. झालेले गैरसमज भविष्यात होणार नाहीत. केवळ निवडणूक आहे म्हणून बोलत नाही, पाठिंबा मिळावा म्हणून बोलत नाही, विकासाच्या दिशेने सातार्याला न्यायचे आहे व संघर्ष नको आहे म्हणून हे बोलत आहे. आता कुणी कानाला लागले तरी त्यांचे ऐकायचे नाही. बाकीचे लोक आमच्यामध्ये तुकडे पाडू शकतात, दुफळी माजवू शकतात त्यातून आमचेच नुकसान आहे. त्यामुळे आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे, असेही उदयनराजे म्हणाले.
विरोधी उमेदवार आदल्या वर्षी जत्रेला येतात त्यानंतर फिरकत नाहीत. ते पुन्हा दुसर्या वर्षीच्याच जत्रेला येतात. माझ्यावर दहशतीची टिका केली जाते. मात्र, माझी दहशत ही प्रेमाची व आदरयुक्त आहे. तुमची दहशत कसली आहे ते मला माहित नाही, असा टोलाही उदयनराजेंनी नरेंद्र पाटील यांना लगावला. माथाडी कामगारांचा कायदा मोडण्याचे काम कुणी केले तर मी चळवळ उभी करेन व त्या चळवळीचे नेतृत्व मी स्वत: करेन, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, पाटीलसाहेब, आपल्याकडून आमची पक्षाचे कार्यकर्ते म्हणून एक विनंती आहे, आज लोकसभेच्या निमित्ताने आपण सर्वांना एकत्र आणलं, बसवलं, चर्चा केली. पवारसाहेबांच्यापुढे सगळे विषय झाले. पुढं सुद्धा पक्ष म्हणून आपलं तेवढंच लक्ष या सातारा जिल्ह्यावर रहावं. जर कुठं पक्षाच्या चौकटीबाहेर जावून काय होत असेल तर आपण त्यावेळीपण तेवढंच लक्ष द्यावं. या निवडणुकीत संघर्षाचे कुठे गालबोट लागू नये म्हणून नक्कीच खासदारांच्या मागे आम्ही त्यावेळीपण होतो, यावेळच्या निवडणुकीमध्येसुद्धा ताकदीने आम्हाला जेवढ शक्य आहे तेवढं आम्ही काम करू. यापूर्वीही आम्ही खासदारांना सातारा व जावली तालुक्यातून लिड दिले आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथे ज्या भावना मांडल्या त्याच माझ्याही आहेत. शरद पवार यांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा आदेश मानून आम्ही सर्वजण काम करू. खासदारांच्यात व आमच्यात कोणतीही राजकीय तडजोड झालेली नाही. सातार्यात शांतता असावी आणि शरद पवारांचा शब्द पाळला जावा यासाठी आम्ही खासदारांचे काम करणार आहोत, असेही शिवेंद्रराजेंनी सांगितले.
खासदारसाहेब, तुम्ही बोलता, ‘एक बार मैने जो कमिटमेंट की तो खुदकी भी नही सुनता’ पण मीही सांगतो ‘मैं जो बोलता हूँ ओ मैं करता हूँ, लेकीन मैं जो नही बोलता ओ मैं डेफिनेटली करता हूँ। ’ एक तर मी कमी बोलतो, सगळा मार्केटिंगचा विषय आहे. सगळं राजकारण मार्केटिंगवर चाललंय. त्यामुळे नक्कीच खासदारसाहेब आम्ही आपल्याबरोबर आहोत. कुठेही आमच्याकडून दगाफटका होणार नाही, हा शब्द मी या मेळाव्याच्या निमित्ताने देतो. भाऊसाहेब महाराजांचे जे कार्यकर्ते जुने असतील, माझ्याबरोबर काम करणारे नवीन सहकारी असतील किंवा माझ्या जावली तालुक्यातील सर्व सहकारी असतील, आम्ही आपणाला पूर्ण साथ देवू, हा शब्द यानिमित्ताने देतो, असेही आ. शिवेंद्रराजे म्हणाले.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, दोन्ही राजांचे मतभेद आज दूर झाले आहेत. छत्रपती उदयनराजे स्वाभिमानी आहेत तर आ. शिवेंद्रराजे दिलदार आहेत. दोन्ही राजांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून इतिहास घडवावा. अण्णासाहेब पाटील, शरद पवार माझे अराध्यदैवत आहेत. मात्र, विरोधी उमेदवाराने बुद्धीभेद करू नये. उदयनराजेंनी श्रीकृष्णाची भूमिका घ्यावी. आम्ही पाच आमदार पाच पांडवांप्रमाणे तुमच्या बरोबर राहू.
यावेळी लालासाहेब पवार, सतीश चव्हाण, बाळासाहेब गोसावी, चंद्रकांत जाधव, निशांत पाटील, अशोक मोने यांनी आपली मनोगते व्यक्त केली. व्यासपीठावर गीतांजली कदम, समींद्रा जाधव, सुहास राजेशिर्के, सुधीर धुमाळ, सुनील काटकर, रवी साळुंखे, प्रकाश बडेकर, राजू भोसले, अमोल मोहिते, अविनाश कदम, शेखर मोरे, समृद्धी जाधव यांच्यासह सातारा, जावली तालुक्यातील जि.प., पं.स. सदस्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन संतोष कणसे यांनी केले.
सौजन्य- दैनिक पुढारी
राजकीय
शिवेंद्रराजे आणि मी टॉम अँड जेरी - खासदार उदयनराजे


