NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

कराडात मसाले कंपनीच्या गोदामाला आग

लाखो रुपयांची हानी

67karad-fire.jpg

कराड, दि. ६ – कराड-पाटण रस्त्यावरील बावडेकर मसालेवाले यांच्या गोदामाला मंगळवारी दुपारी अचानकपणे लागलेल्या आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याची घटना घडली. दरम्यान, अग्नीशामक दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी पोहचल्यामुळे आग आटोक्‍यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-पाटण रस्त्यावर बावडेकर मसालेवाले यांचे मोठे गोदाम आहे. याठिकाणी उत्पादित माल, व त्यांचे पॅकिंग केले जाते. मंगळवारी दुपारी अचानकपणे या गोदामाला आग लागली. दुपारची वेळ असल्याने आगीने थोड्या अवधीतच रौद्ररुप धारण केले. त्यामुळे सर्वांचीच पळापळ झाली. यावेळी कराड नगरपालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. दोन्ही बंबासह परिसरातील नागरिकांनी सुध्दा आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यामुळे आग आटोक्‍यात आणल्यात यश मिळाले.

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र या गोदामाच्या शेजारी असलेल्या खुल्या जागेतील पालापाचोळा पेटवला होता, यातील ठिणगी संबंधित ठिकाणी पडल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कराड पालिकेच्या दोन्ही अग्निशामक बंबांनी सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नातून आग पूर्णपणे विझविली. बावडेकर मसालेवाले यांच्या मसाले फॅक्‍टरीच्या वरच्या मजल्यावर उत्पादित मालाचे पॅकिंग करण्याचे साहित्य साठा करुन ठेवण्यात आले होते. नेमकी याच ठिकाणी आगीची दुर्घटना घडली. यामुळे लाखो रुपयांची हानी झाली आहे.