NEWS & EVENTS

राजकीय

श्रीनिवास पाटलांनी स्वत: बांधला उदयनराजेंना फेटा

सदिच्छा भेटीचे निमित्त, दोघांमध्ये दिलखुलास चर्चा

86shri.jpg

कराड, दि. 14 – सातारा लोकसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी जाहिर झालेल्या खा. उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दुपारी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या गोटे (ता. कराड) येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी पाटील यांनी स्वत: उदयनराजेंना फेटा बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सदिच्छा भेट आणि त्यानिमित्ताने झालेली दिलखुलास चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेची ठरली. दरम्यान, उदयनराजे आणि श्रीनिवास पाटील यांच्यात काही काळ दिलखुलास चर्चाही झाली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे विद्यार्थी दशेपासूनचे मित्र. शरद पवार यांच्या आग्रहास्तव 1999 मध्ये श्रीनिवास पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला. कराड लोकसभा मतदार संघातून ते दोनवेळा राष्ट्रवादीचे खासदार झाले. या काळात त्यांनी जनतेशी ठेवलेला संपर्क आणि केलेल्या विकासकामांच्या बळावर त्यांनी मतदार संघात आपले स्थान भक्‍कम केले होते. तथापि, पुनर्रचनेत कराड लोकसभा मतदार संघ रद्द होऊन सातारा लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आला. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यानंतर श्रीनिवास पाटील यांची सिक्‍किमच्या राज्यपालपदी वर्णी लागली. ती जबाबदारीही त्यांनी निष्ठेने पार पाडतानाच सिक्‍किममधील सर्वसामान्यांना राजभवनाची दारे खुली केली. त्याद्वारे ते पिपल्स गर्व्हनर ठरले.

यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून बराच खल सुरू होता. श्रीनिवास पाटील यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत होते. तथापि, खा. उदयनराजे यांच्याच नावावर अंतिमत: शिक्‍कामोर्तब झाले. त्यानंतर उदयनराजेंनी कराड तालुक्‍यापासून सुरूवात करत नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यास सुरूवात केली. माजी राज्यपाल यांची बुधवारी घेतलेली सदिच्छा भेट हा त्याचाच एक भाग होता. तथापि, श्रीनिवास पाटील यांनी या भेटीतही आपल्यातील कलेचा प्रत्यय उदयनराजेंना आणून दिला. उदयनराजेंचे निवासस्थानी आगमन होताच प्रारंभी बुके देऊन स्वागत केले. त्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी स्वत: उदयनराजेंना फेटा बांधला. या सदिच्छा भेटीचे फोटो सायंकाळी सर्वत्र व्हायरल झाल्याने कराड शहर आणि तालुक्‍यात ही भेट चर्चेची ठरली.


https://www.youtube.com/embed/