सातारा, दि. 13 – जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सातारा शहरातील गोडोली, जरंडेश्वर नाका, सदरबझार, त्रिशंकू भागातील फ्लेक्स काढण्याचे काम सातारा नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने सुरु केले आहे.
यामध्ये शासकीय कार्यालयातील कोनशिला झाकण्यासोबत विकास कामाचे फ्लेक्स, बॅनर, तसेच प्रमुख चौकातील राजकीय पक्षाचे बॅनर, काढले आहेत. आज दिवसभरात एकूण 350 फ्लेक्स बॅनर काढले आहेत, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी दिली. या कारवाईमध्ये शैलेश अष्टेकर, प्रेमलिंग मोहिते, अतिक्रमण विभागाचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. ही कारवाई सलग सुरु राहणार असल्याचे निकम यांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जिल्ह्यातील विभाग प्रमुखांना दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सातारासह जिल्ह्यामध्ये सुरु झाली आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम 1985 नुसार जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज लावण्यास परवानगी नाही. त्यामुळे कार्यक्षेत्रातील भिंती, लोखंडी खांबांवर लावण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज काढणे आवश्यक आहे.
राजकीय
पोस्टर्स-बॅनर्स काढण्याची लगबग सुरु


