सातारा, दि. 14 - सकाळच्या प्रसन्न वातावरणात आपापल्या महाविद्यालयांचे झेंडे खांद्यावर घेऊन राष्ट्रीय छात्रसेनेच्या शिस्तीत भगवे स्नातक पोषाख परिधान करून पदवीच्या यशस्वितेचे तेज चेहऱ्यावर मिरवत काढलेल्या मिरवणुकीने आज येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिवाजी विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात झाला.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग कुटुंबाबरोबरच समाज, संस्था आणि देशाच्या उन्नतीसाठी करावा, असे मत शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. धनाजी कणसे यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाच्या नवीन नियमानुसार आता महाविद्यालय पातळीवरील शिवाजी विद्यापीठाचा जिल्ह्यातील पहिला पदवी प्रदान सोहळा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या येथील आठ महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. धनाजी कणसे, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, ऑडिटर डॉ. ए. डी. आंधळे, कायदा सल्लागार ॲड. दिलावर मुल्ला, प्राचार्य आर. डी. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. एम. सांगळे, प्राचार्य शहाजी डोंगरे, प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड आणि विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. कणसे म्हणाले, ‘‘कर्मवीर आण्णांच्या भूमीत या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी होण्याएवढे दुसरे कोणतेच भाग्य नाही.
पदवी मिळाली म्हणजे सर्वकाही झाले असे नाही तर आयुष्यभर प्रत्येकाने शिकायचे असते. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजातील सर्व घटकांना झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वप्ने जरूर पाहावीत; पण आपले पाय नेहमी जमिनीवर राहतील याची दक्षता घ्यावी.’’
डॉ. अनिल पाटील म्हणाले, ‘‘उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी जगात सर्वांत जास्त भारतात आहेत. मात्र, आता बदलत्या परिस्थितीनुसार अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज असून, रयत शिक्षण संस्थेने ही प्रक्रिया केव्हाच सुरू केली आहे.’’ प्राचार्य डॉ. कानडे यांनी प्रास्ताविकात संस्था आणि महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्या सौ. गायकवाड यांनी आभार मानले.
सातारा जिल्हा
साताऱ्यात प्रथमच पदवीदान सोहळा


