मेढा, दि. 19 (प्रतिनिधी) – भिवडीसारख्या छोट्या गावात सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अर्चना दिलीप दरेकर हिने परिस्थितीलाही नमवत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राज्य सेवा परीक्षेत यश मिळवत गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अर्चनाच्या या यशाने तिचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
भिवडीसारख्या लहानशा गावात जन्मेलेल्या अर्चनाचे शिक्षण प्राथमिक शाळेत झाले. तिने महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी कॉलेज सातारा येथे पूर्ण केले. जिद्द चिकाटीच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत राज्य सेवा परिक्षेत यश मिळविले. भिवडी गावातुन तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पंचक्रोशीतील महिला, युवक, विद्यार्थी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. त्यानंतर तिचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात मेढा पोलिस स्टेशनचे राठोड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हुमगाव विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी रांजणे हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी सोमनाथ काशिळकर म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता चांगली आहे. यावेळी स्पर्धा यश ऍकॅडमी पुणेचे संस्थापक प्रा. भूषण ओझर्डे, पोलिस पाटील संघटना, जावली जीवन मित्र फौंडेशनचे सदस्य, ग्रामस्थ मंडळ भिवडी, सोनगाव, बामणोली, कोलेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा जिल्हा
भिवडीच्या अर्चनाचे राज्य सेवा परीक्षेत यश


