सातारा ,दि. 4 (प्रतिनिधी)- सातारा शहराची ऐतिहासिक, समृद्ध व शांत अशी ओळख आहे. माझ्या येथील कालावधीत ही प्रतिमा आणखी उंचावण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. याला बाधक असणारी गुन्हेगारी मोडीत काढणार असल्याचा इरादा जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. गुन्हेगारी निर्मूलनासाठी बेसिक पोलिसिंग, वाहतुकीसाठी स्वयंशिस्त व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करताना गुन्हेगारांना स्टंट नाही तर थेट हिसकाच दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
पुणे येथे गेल्या सहा महिन्यात आपण वाहतुकीच्या बेशीस्तीला लगाम घालताना , बेस्ट एफर्ट दिले आहेत. यामुळे अनेक सकारात्मक बदलही झाले आहेत. पुणे येथे ज्या आयडीया वापरल्या तो अनुभव म्हणून साताऱ्यासाठीही वापरला जाईल. अर्थात त्याबाबतचा आढावा घेवून काय काय करता येईल, हे ठरवले जाईल. पोलिस हे समाजातील प्रत्येक घटकासाठी आधार आहेत. सातारकर निश्चित पोलिसांसोबत राहतील, त्याचप्रमाणे एसपी म्हणून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मी कायम ठामपणे असेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्या पुढे म्हणाल्या, जगात गुन्हेगारी नाही असे कुठेही नाही. मात्र साताऱ्यात गुन्हेगारी कमी कशी राहील व त्यावर जास्तीत जास्त प्रतिबंध कसा राहिल यावर आपला फोकस राहणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात असणाऱ्या फलटण, कऱ्हाड, सातारा या तिन्ही गुन्हेगारी सेंटरवर लक्ष केंद्रीत करून बेसिक पोलिसींगवर भर दिला जाईल.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी गुंडाना कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल. तडीपार असणाऱ्यांच्या तडीपारीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले जातील. जिल्ह्यात असलेल्या अवैध धंद्यांना त्या त्या ठिकाणच्या प्रभारींनी आळा न घातल्यास क्रॉस रेडमध्ये अवैध धंदे सापडल्यास त्याचे परिणाम प्रभारी अधिकाऱ्यांना भोगावे लागतील. असा सज्जड दम त्यांनी जिल्ह्यातील कारभाऱ्यांना दिला आहे.
सौजन्य - दैनिक प्रभात
सातारा जिल्हा
गुन्हेगारांना स्टंट नाही, थेट हिसकाच दाखवणार - तेजस्वी सातपुते
गुंडाचे पॅकअप करणारच; निवडणुका शांततेत पार पाडणार


