NEWS & EVENTS

राजकीय

आमदार गोरेंना मतदारसंघातून हद्दपार करायचं हे सामान्य जनतेच व आमचं आधीच ठरलंय

सर्वपक्षिय नेतेमंडळींनी मोहिमेत सहभागी - शेखरभाऊ गोरे

15Shekhar-Gore.jpg

सातारा : माण मतदारसंघात सन २०१४ पासून आम्ही जनतेच्या आशीर्वादाने आमदार जयकुमार गोरेंची गुंडगिरी व हुकुमशाही मोडीत काढली आहे. आमदार गोरेंना थांबवत त्यांना मतदारसंघातून हद्दपार करायचं हे सामान्य जनतेच व आमचं आधीच ठरलंय. सर्वपक्षिय नेतेमंडळींच्या जे मनात आहे ते आम्ही गेली सात वर्षे करतोय. आजपर्यंत ते कृतीतून दाखवूनही दिले आहे. आता सर्वपक्षिय नेतेमंडळी एकत्र येऊन आमदार गोरे हटावचा नारा देत... आमचं ठरलंय म्हणत आहेत. पण तुम्हा सर्वांच्या मनात खरच जर आमदार गोरेंना मतदारसंघातून हटवायचे असेल तर तुम्हीच सर्वजण या मोहिमेत सहभागी व्हावे १११ टक्के आपली मोहीम यशस्वी होईल असे आवाहन माण खटावचे युवानेते शेखरभाऊ गोरे यांनी माण विधानसभा मतदारसंघातील नेतेमंडळींना केले आहे. माण विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात सर्वपक्षिय नेतेमंडळींनी एकत्र येऊन आमचं ठरलंय... म्हणत आमदार गोरे हटाव मोहिमेचा नारा दिला आहे. या पाश्वर्वभूमीवर शेखरभाऊ गोरे यांनी कुळकजाई ता.माण येथे पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी ते बोलत होते.

शेखरभाऊ गोरे म्हणाले, आमदार जयकुमार गोरेंची सन २००९ पासूनची गुंडगिरी व हुकुमशाही प्रवृत्ती सामान्य जनतेने पाहिली आहे. अनेकांना त्याचा फटकाही बसला आहे. ज्यांनी त्यांना निवडणूकीत मदत केली त्यांनाही या बहाद्दराने सोडले नाही. जाणीवपूर्वक बोगस तक्रारी करून त्यांच्यामागे ससेमिरा लावून अनेकांना त्रासच देण्याचा त्यांनी जणू विडाच उचलला होता. मी राजकारणात सक्रिय झाल्यानंतर वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीची दहशत, गुडंगिरी कमी करायची या हेतूने लक्ष देत प्रसंगी अंगावरती केसेस घेत त्यांची गुंडगिरी मोडीत काढली आहे. त्यांच्या जाचातून सामान्य जनतेला बाहेर काढण्याचे काम करून दाखवल्यानेच आज सर्वसामान्य जनता मोकळा श्वास घेत आहे. सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करत चूकीच्या मार्गाने राजकारण करणाऱ्या आमदारांसारख्या अपप्रवृत्तींना वेळीच थांबवणे गरजेचे होते. म्हणूनच आपण त्यांची गुंडगिरी दहशत जसी हद्दपार केली तशीच आमदार जयकुमार गोरे यांनाही मतदारसंघातून हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे. त्यांना हद्दपार करण्याची आमची मोहीम गेली सात वर्षे चालू आहे. पाच वर्षात बहुतांश सत्तास्थाने ताब्यात घेत त्याच्या राजकीय कारकिर्दीला सुरूंग लावण्याचे काम केले आहे. ती मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात आली असून ७५ टक्के काम आम्ही पूर्ण केले आहे.आता राहीलेय ते फक्त २५ टक्के काम. जर सर्वपक्षिय नेतेमंडळी याच मुद्द्यावर एकत्र आलेत तेही या मोहिमेत सहभागी झाले तर उर्वरित २५ टक्के काम एकजूटीने पूर्ण करून वाईट अपप्रवृत्तींच्या आमदारांना मतदारसंघातून कायमचेच हद्दपार करूयात असेही त्यांनी आवाहन केले आहे.

सन २०१२ पासून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर स्वकष्टातून कमावलेल्या पैशांतून काही हिस्सा जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करायचा या हेतूने स्वखर्चातून कामे सुरू केली. त्यादरम्यान आमदार गोरेंची गुंडगिरी, दहशत, हुकुमशाही पध्दत अनुभवली. या गुंडगिरीला, दहशतीला सर्सामान्य जनता त्रासलेली होती. त्याची हीच दहशत गुंडगिरी मोडीत काढण्याचा निर्धार करून मैदानात उतरलो होतो. सन २०१४ ला त्याच्याविरोधात निवडणूकही लढलो. आमदार गोरेंना शह देत माण तालुक्यातील खादी ग्रामोद्योग, खरेदी विक्रि संघ, विविध ग्रामपंचायती, सोसायट्यांत वर्चस्व मिळवून दिले. मार्केट कमिटी समान सोडली. तर जि.बँकेच्या निवडणूकीत स्व.पोळ तात्यांसाठी पदरमोड करून कोट्यावधी रूपये घालवले. जि.प.पं.स.निवडणूक प्रतिष्ठेची करत त्यातही यश मिळवले. म्हसवड नगरपालिकेत आमदार गोरेंच्या वर्चस्वाला सुरूंग लावत सत्ता परिवर्तन घडवत आमदारांचे माण मतदारसंघात पानिपत केले आहे.

आजपर्यंत आपण कोट्यावधी रूपयांची विकासकामे स्वखर्चातून केली आहेत. सिंचन योजनेचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले, पाण्याचे टँकर, पोकलेन मशीनरी दिल्या मात्र त्याचा गाजावाजा करत कधीही मी नारळ फोडले नाहीत. मी केलेल्या कामाचे श्रेय घेत नाही मग दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घ्यायचा तर विषयच येत नाही. खासदार रणजिसिंह निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला पण ते निवडून आल्यानंतर त्यांना कधीही भेटायला गेलो नाही की त्यांच्यामागे लागलो नाही. आपल काम प्रामणिक करायच बस्स एवढाच डोक्यात विषय कायम असतो. माण विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी माण खटावच्या जनतेची सेवा करणे हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून सन २०१२ पासून स्वखर्चातून कोट्यावधी रूपयांची विविध विकासकामे करत माण मतदारसंघात मागेल त्यांना टँकरने पाणी देत जलसंधारणासाठीही मशीनरी पुरवण्याचे काम आम्ही करत आहोत. माण मतदारसंघात आपण स्वकर्तृत्वावर सामाजिक व राजकीय वाटचाल करत असताना ज्या पक्षांत असेन त्याचे निस्वार्थीपणे काम केले आहे. पक्षसंघटना मजबूत करत मतदारसंघातील बहुतांश सत्तास्थाने त्या पक्षाच्या झेंड्याखाली आणली. मात्र तोच पक्ष आपल्याला दुय्यम वागणूक देत असल्याचे जाणवू लागल्याने नाराज होऊन आम्ही बाहेर पडलो आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी अनेक पक्ष आपल्या संपर्कात असून शेवटच्या क्षणी निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.

आमदार गोरेंची सत्तेची मस्ती उतरवल्यामुळे ते जमीनीवर आले आहेत त्यामुळेच ते सैरभैर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आमची आमदार गोरे हटाव मोहीम शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. या विधानसभा निवडणूकीत ती मोहीम पूर्ण होणार आहे. यासाठी माझी सर्वपक्षिय नेतेमंडळींनी विनंती आहे की, ही मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात आहे तुम्ही ठरवल्याप्रमाणे या मोहिमेत सहभागी झाला तर आमदार गोरेंचा कार्यक्रम निश्चितच झाला म्हणून समजा. दुष्काळी जनतेची आमदारांनी केलेली चेष्टा, कुरघोड्या, विश्वासघात, फसवणूक या चूकांना आता माफी नाही त्याची शिक्षा आपण सर्वजण मिळून त्यांना देऊयात असेही शेवटी शेखरभाऊ गोरे यांनी सांगितले.

आमदार हटाव मोहीम शेवटच्या टप्प्यात....!

सन २०१४ पासून आपण माण मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे हटाव मोहीम हाती घेतली आहे. या पाच वर्षात बहुतांश सत्तास्थाने ताब्यात घेत त्याच्या राजकीय कारकिर्दीला सुरूंग लावण्याचे काम केले आहे.यातील ७५ टक्के काम गेल्या पाच वर्षात पूर्ण केले आहे.या मोहिमेचा आता अंतिम टप्पा सुरू झाला असून आता राहीलेले २५ टक्के काम या विधानसभेला पूर्ण करून माण मतदारसंघात निश्चितच परिवर्तन घडवणार आहे.