NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

मंदिरात चोऱ्या करणारे चोरटे जेरबंद

33lonand-chori.jpg

लोणंद, दि. 17 (प्रतिनिधी) – लोणंद शहरात चार दिवसांपूर्वी मंदिरे फोडून चोऱ्या झाल्या होत्या. या प्रकरणाचा लोणंद पोलिसांनी छडा लावत संशयित आरोपी रामदास विष्णू सानप (वय 31, मुळ रा. सावरगाव, जि. बीड, सध्या रा. गजराजनगर ता. जि. अहमदनगर) यास मंदिरातून चोरीस गेलेल्या मुद्देमाल व मोटारसायकलसह पकडले असून या घटनेची नोंद लोणंद पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद शहरातील तुळजाभवानी मंदिर, महादेव मंदिर, तसेच दत्त मंदिरात चोऱ्या झाल्या होत्या. या चोरीत एक अर्धा किलो वजनाची भवानी देवीची पितळी मूर्ती, अर्धा किलो वजनाचे तांब्याचे अभिषेक पात्र, अर्धा किलो वजनाचे त्रिशुल, सव्वा किलो वजनाचा पंचधातूचा भवानी माता देवीचा मुकुट, एक गणपतीची पितळी मूर्ती, दानपेटीतील पैशाची चिल्लर असा एकूण सतरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याबाबत लोणंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता.

सदर चोरीच्या घटना घडल्यानंतर डीवायएसपी फलटण डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी वेगवेगळ्या दोन टीम करुन चोरट्यांचा शोध घेण्याचे काम चालु होते. शनिवारी रात्री पोलीस लोणंद शहरात पेट्रोलिग व नाकाबंदी करीत असताना रामदास विष्णु सानप ही व्यक्ती शहरात मध्यरात्री मोटारसायकलसह संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने मंदिर चोरीची कबुली दिली व विविध ठिकाणी मंदिर चोरीचा ठेवलेला सर्व मुद्देमाल काढून दिला. मंदिराचा सर्व मुद्देमाल लोणंद पोलिसांनी हस्तगत केला आहे, तसेच त्याच्या ताब्यात होंडा स्पलेंडर मोटारसायकल एम एच 11 एजे 1990 हीसुद्धा लोणंद पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल असलेली मोटारसायकल मिळून आली. सदर गुन्ह्यातील मिळून दानपेटीतील रक्कमेसह 43 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर चोऱ्यांचा छडा लावण्याकरिता सपोनि गिरीश दिघावकर, सहाय्यक फौजदार यशवंत महामुलकर, शिवाजी तोडरमल, सुनिल गायकवाड, बुवासाहेब वाघमारे, दत्ता दिघे, ज्ञानेश्वर साबळे, विशाल वाघमारे, संजय देशमुख, अतुल गायकवाड, संजय जाधव, फैय्याज शेख, अविनाश शिंदे, चालक अनिल कानलोड यांनी अथक परिश्रम घेतले. अधिक तपास दत्ता दिघे हे करीत आहेत.