NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

प्रांत कार्यालय परिसरातील ती बांधकामे बेकायदेशीरच

20satara-nagarpalika.jpg

सातारा, दि. 18- सातारा प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात सक्षम अधिकाऱयांची परवानगी नसताना अनाधिकृतरित्या पत्र्याची शेड, लाईट, बांधकाम केले आहे. अशा प्रकारचा अहवाल तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या मंडल अधिकाऱयांच्या कमिटीने सादर केल्यामुळे खळबळ माजली आहे.

या चौकशी अहवालामुळे पिटीशन रायटर, मुद्रांक विक्रेते, दस्त लेखनिकांचे खूप वर्षांपासून बस्तान उठणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याठिकाणी टाकलेली पत्र्याची शेड, वापरत असलेली लाईट, बांधकाम बेकायदेशीर असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. संबंधित अधिकारी लवकरच कारवाई करुन कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांना गाशा गुंडाळायला लावणार की त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार याबाबतही सातारकरांना उत्सुकता लागलेली आहे. मनसेनेही याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती.

प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात अनेक वर्षे पिटीशन रायटर, मुद्रांक विक्रेते, दस्त लेखनिक यांनी सक्षम अधिकाऱयांच्या परवानगीशिवाय पत्र्याची शेड, शासकीय मिटरमधून लाईटचा वापर करतात. दरपत्रक न लावता मनमानी दराने नागरिकांना लुटून ही मंडळी चांगलीच कुबेर झाली आहेत. यात शासकीय फुकटची जागा आणि लाईट वापर करुन धंदा करतात. बातम्या प्रसिद्धी झाल्यानंतर त्यातील काहीजण तावात फिरत होते. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल पवार आणि कार्यकर्त्यांनी आवारातील अतिक्रमण हटवा म्हणून तहसीलदारांना निवेदन दिले. कारवाई झाली नाही तर कार्यालयाला टाळे आणि खळ्ळ खटय़ाकचा इशारा दिला होता. त्यावर तत्काळ तहसीलदारांनी मंडल अधिकाऱयांना चौकशी आदेश देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले. तो अहवाल सादर करताना सदर अतिक्रमण हे सक्षम अधिकारी यांच्यासह नगरपालिका, बांधकाम विभागाच्या परवानगी न घेता केले असल्याचे सिद्ध झाले. तसेच सेतु कार्यालयात दरपत्रक न लावता तेथील कर्मचारी बेकायदेशीरपणे मनमानी दराने पैसे घेतात. याबाबत अधिक माहिती घेऊन कारवाई करावी, असे सूचवले आहे.