सातारा, दि. ६ – सातारा शहरातील विविध प्रभागामध्ये कचरा कुंड्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे मे यशश्री एंटरप्रायजेस सोलापूर व साई गणेश एन्टर प्रायजेस या कचरा संकलन करण्यासाठी नव्याने ठेका देण्यात आलेल्या संस्थासमोर स्वच्छ साताराचे आव्हान पेलणार का? असा प्रश्न आहे. सातारा नगरपरिषदेला शहरातील कचरा समस्येचे आजपर्यंत निर्मुलन करण्यात यश आले नाही. या आधी शहरामधील साठलेला कचरा गोळा करण्यासाठी साशा कंपनीला ठेका दिला होता. आता तो मे यशश्री एंटरप्रायजेस सोलापूर व साई गणेश एंटरप्रायजेस ठाणे यांच्याकडे देण्यात आला आहे.
1 मार्चपासून शहरात कचरा संकलनाचे काम त्यांनी सुरू केले आहे. सातारा शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 15 ची जबाबदारी यशश्री यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे 30 घंटा गाड्या आहेत व हेल्पलाईनसाठी 5 स्वतंत्र गाड्या, तसेच 3 ट्रॅक्टर आहेत. 16 ते 20 प्रभागाची जबाबदारी साई गणेश एंटरप्रायजेस ठाणे यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे 10 घंटा गाड्या आहेत. प्रत्येक गाडीवर स्पिकरची यंत्रणा आहे. ज्यामध्ये स्वच्छ साताराचे गाणे वाजत राहणार आहे. तसेच यासोबत संस्थेचे 4 व्यवस्थापक, 4 फिरते पथक, गाड्याची उंची मोठी असल्याने प्रत्येक घंटा गाड्यावर 2 बिगारी आणि ड्रायवर, अशी व्यवस्था केली आहे. ज्यामुळे कचरा विलग करूनच गाडीत घेतला जाईल. यामध्ये सातारा शहर कचरा कुंडीमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. मात्र प्रथमत: विविध प्रभाग, रस्ते, येथील सर्वे करून कचरा या ठिकाणी का साठतो. तेथील नागरिक घंटागाडीत का कचरा टाकत नाहीत याचा सर्वे करत आहोत, अशी माहिती यशश्री एंटरप्रायजेसचे सातारा व्यवस्थापक हरिष शिवशरण यांनी दिली.
ओसंडून वाहणाऱ्या कचरा कुंड्यामुळे सातारकर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे स्वच्छ सर्वेक्षण 2018, 2019 मध्ये सातारा शहराची कामगिरी काही विशेष दिसली नाही. यासाठी सातारा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने 2020 साठी शर्थीचे प्रयत्न करणे अत्यावश्यक बनले आहे. असे असले तरी यामध्ये सातारकर नागरिकांचे देखील सातारा नगरपरिषदेला सहकार्य मिळणे आवश्यक आहे. लवकरच सोनगाव येथील कचरा डेपो येथील प्रोसेसिंग युनिट कार्यान्वित होईल. मात्र, यासाठी नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा वेगळा करूनच गोळा करणे व तशाच स्वरूपात पोहचणे आवश्यक आहे.
यामध्ये आता पालिका प्रशासनाचा कस लागणार आहे. सातारा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामध्ये कायमच कचरा प्रश्नावरून हलकल्लोळ माजला आहे. या प्रश्नावरून कायमच चर्चेत राहिलेला एकमेव विभाग म्हणून आरोग्य विभागाचे नाव निघते. शहरातील नागरिकांची मदार या विभागावर असल्याने त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. मात्र त्यांची पूर्तता करण्याचे कौशल्य अद्याप त्यांना साध्य करता आले नसल्यानेच अनेक वेळा अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागत असल्याचे वेळोवेळी दिसत आहे.
सातारा जिल्हा
साताऱ्यात कचरा कुंड्या ओव्हर फ्लो
नव्या ठेकेदारांना स्वच्छ सातारा शहराचे आव्हान पेलणार का?


