कराड : प्रतिनिधी - मतदार यादी संक्षिप्त पुर्ननिरिक्षण कार्यक्रमादरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये इतर विधानसभा मतदार संघातील नावांचा समावेश करून गोलमाल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत राष्ट्रीय काँग्रेसच्या कराड-दक्षिण विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना निवेदन देऊन सत्यता पडताळणी करूनच मतदार यादीत नावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने विधानसभा मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी दि. 20, 21, 27 व 28 जुलै 2019 या तारखा निश्चित केल्या आहेत. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर मतदार यादी विधानसभेसाठी गृहित धरण्यात येणार आहे.
मतदार यादी संक्षिप्त पुर्ननिरिक्षण कार्यक्रमामध्ये दि. 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीचा मतदार म्हणून समावेश करण्यात येणार आहे. तथापि कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये वाळवा व पलुस कडेगांव विधानसभा मतदार संघातील मतदार यादीमध्ये मतदार म्हणून समावेश असलेल्या परंतू कृष्णा हॉस्पिटल व कृष्णा शिक्षण संकुल तसेच कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये नोकरीस व शिक्षणासाठी आहेत, अशा विद्यार्थी व नागरिक मतदारांची नांवे संबंधित मतदार संघातून कमी करुन ती कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात समाविष्ठ करण्याकरीता काही राजकीय मंडळी कागदपत्रांची जुळवाजुळव करत असल्याचे समजले आहे. त्यामुळे कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये इतर मतदार संघातील नांवे समाविष्ठ करत असताना संबंधित नागरिकाचे आधारकार्ड, रेशनकार्ड व रहिवाशी दाखला किती वर्षापुर्वीचे आहेत. याची सत्यता पडताळणी करणे आवश्यक असून नमुना नं. 6, 7, 8 व 8 अ या नमुन्यातील कागदपत्रांची सत्यता व पडताळणी करण्यात यावी. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येक मतदान केंद्रासाठी प्रतिनिधी नियुक्त केला आहे. या प्रतिनिधी समवेत इतर मतदार संघातील नांवे समाविष्ठ करताना सत्यता पडताळणी करणे आवश्यक आहे.
तरी वरील सर्व बाबींचा विचार करता दि. 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पुर्ण होणार्या नागरिकाचे नांव मतदार यादीमध्ये समाविष्ठ करण्यात यावे. परंतू, वर नमुद केलेले मतदार संघातील नावे कमी करुन ती कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये समावेश करण्यापुर्वी मतदाराचे विहित नमुन्यातील कागदपत्रांची पूर्ण तपासणी व खात्री करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, जयवंतराव जगताप, नाना पाटील, शंकरराव खबाले, सुनिल पाटील, नरेंद्र पाटील, नामदेव पाटील, वैभव थोरात, शिवाजीराव मोहिते, विद्याताई थोरवडे, मंगला गलांडे, नितेश जाधव, सचिन पाटील, शिवाजीराव जाधव, वैशाली वाघमारे, नितीन थोरात, इंद्रजीत चव्हाण, हणमंत भोपते, मनिषा तांबे, रणजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
मलकापूर निवडणुकीवेळी झाला होता प्रयत्न
यापुर्वी मलकापूर नगरपरिषद निवडणूकीदरम्यान मलकापूर मतदार यादीमध्ये इतर गांवातील मतदारांचा समावेश करण्याचा तसेच संभाव्य उमेदवारांचे नांवे वगळण्याचा प्रयत्न केला होता. परंतू याबाबत तक्रार दाखल केल्याने मतदान नोंदणी अधिकार्यांनी योग्य ती कार्यवाही केली होती.
सौजन्य - पुढारी ऑनलाईन
राजकीय
मतदार यादीत गोलमाल करण्याचा प्रयत्न
कराड-दक्षिणमधील प्रकार; काँग्रेस पदाधिकार्यांचे प्रांताधिकार्यांना निवेदन


