मुंबई, दि.29- लोकसभा निवडणुकीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकताच उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यावेळीच तिला उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार काँग्रेसने मुंबई उत्तर मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरला उमेदवारी जाहीर केली आहे. उर्मिला मातोंडकरचा सामना भाजपाच्या गोपाळ शेट्टींविरोधात असणार आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला, मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकरने बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उर्मिलाने त्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. पक्षात प्रवेश करताना आपण निवडणुकासाठी प्रवेश करत नसल्याचं म्हटलं होतं. ‘बॉलिव़ू़डमधून अनेक कलाकार राजकारणात प्रवेश करतात. तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाकडे त्याच दृष्टीकोनातून पाहू नका. मी निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. निवडणुकीनंतरही मी काँग्रेससोबतच असणार आहे’, असं तिने म्हटलं होतं.
मी आज सक्रीय राजकारणात प्रवेश करत आहे. माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या आहेत असंही उर्मिलाने सांगितलं होतं.
उर्मिला मातोंडकरने पक्षप्रवेश केल्यानंतर भाजपावर सडकून टीका केली होती. देशभक्ती किंवा धर्म म्हणजे काय हे सांगणारे तुम्ही कोण, असा सवाल तिन केला होता. युती सरकारनंतर देशात विकासापेक्षा हिंसक वातावरण वाढल्याची टीका उर्मिलाने केली. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ असं म्हटलं जातं. मात्र हे प्रेम कुठे आहे? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढलं, एकमेकांविषयी द्वेष वाढला. विकासाचं चित्र कुठे आहे? विकासाची स्वप्न दाखवली गेली. विकासाच्या परीकथा सांगितल्या गेल्या. मात्र प्रत्यक्षात परीकथा नसून पिशाच्चकथा झाली आहे, अशी सडकून टीका उर्मिलाने केली.
राजकीय
उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर
उर्मिला मातोंडकरचा सामना भाजपाच्या गोपाळ शेट्टींविरोधात असणार आहे


