NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहने, हातगाड्यांवर कारवाई

कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा दणका

11karad-nagarpalika.jpg

कराड, दि.१९ – येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेल्या दोन दिवसांत मलकापूरपासून ते कोल्हापूर नाका, दत्त चौकापर्यंत वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या 38 वाहने आणि हातगाड्यांवर कारवाई केली. कराड तसेच मलकापूर येथील मुख्य रस्त्यावर अनेक चारचाकी वाहने, फळांचे, खाद्यपदार्थांचे हातगाडे दिवसभर उभे असतात. त्यामुळे अनेकदा वाहनधारकांना कसरत करावी लागते. तसेच अडथळा ठरतील अशा प्रकारे वाहने आणि हातगाडे उभे केल्याने अपघातही झाले आहेत.

ही परिस्थिती लक्षात घेऊन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामचंद्र पाटील, हवालदार सुरेश सावंत, विठ्ठल चव्हाण, पो. नाईक पाटणकर, महिला पोलीस कॉ. पूजा पाटील यांनी दोन दिवसांत 38 वाहनांवर कारवाई केली.

ढेबेवाडी फाटा, सेवा रस्त्यावर उभी असणारी वाहने, हातगाडे व कोल्हापूर नाक्‍यामापासून ते दत्त चौकापर्यंत वाहतूकीस अथडळा ठरणाऱ्या वाहने, हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहने आणि हातगाड्यांवर कारवाईची मोहिम सुरू राहणार असून संबंधितांनी नोंद घेऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.