NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

खासदार शरद पवारांची साताऱ्यात ७ मार्च रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स

राजकीय चर्चांना उधाण

38shard-pawar-min.jpg

सातारा, दि. 6 - राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार राष्ट्रवादीच्या बुथप्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधणार आहेत. गुरूवार दि.७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांशी खा.शरद पवार संवाद साधणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून खा.उदयनराजे यांच्या उमेदवारीला विशेषत: आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचा जाहीर विरोध आहे. तर नुकतेच खा.उदयनराजे समर्थकांनी बैठक घेत भाजपात जाण्याचा पर्याय सुचविला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व आ.शशिकांत शिंदे पर्यायी तगडे उमेदवार आहेत.

भाजपकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी अप्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात केली असून किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांचा देखील येत्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पवारांनी साताऱ्यात प्रत्यक्षात न येता गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारेच संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.