सातारा, दि.2- सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार खा.श्री.छ उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज सातारा शहरातून निघालेल्या रॅलीत उदयनराजे समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. वाद्यांचा गजर आणि समर्थनार्थ घोषणांनी सातारा शहर दुमदुमून गेले. रिक्षातून सुरु असलेले निवेदन आणि बॅण्डवरील महाराष्ट्रगीत याशिवाय पारंपरिक हलगी पथक यांच्या बरोबरीनेच लमाणी समाजातील महिलांचे लेझीम पथक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, आरपीआय कवाडे गट व गवई गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खा.श्री.छ उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या निवासस्थानी जलमंदिर पॅलेस येथे राजमाता श्री. छ कल्पनाराजे भोसले, श्री. छ दमयंतीराजे भोसले यांच्या समवेत भवानीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर श्री. छ. प्रतापसिंहराजे भोसले तथा दादा महाराज यांच्या प्रतिमेचे त्यांनी पूजन केले. तेथून ते प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत राजवाडा परिसरातील श्री.छ.प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या जवाहर बागेतील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गेले. त्यानंतर श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपुरुषांच्या शहरातील सर्व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यामध्ये तोफखाना येथील वीर लहुजी उस्ताद, नगरपालीका परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, पोवई नाक्यावरील किसन वीर, हुतात्मा स्मारकातील नेताजी सुभाषचंद्र बोस व हुतात्मा स्तंभास अभिवादन केले.
गांधी मैदानावरून सुरु झालेली रॅली पोवई नाक्यावर येत असताना ठिकठिकाणी खासदार श्री. छ उदयनराजे भोसले यांचे फटाके वाजवून, जोरदार घोषणा देत उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत होते. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत निघालेल्या या रॅलीमुळे साताऱ्याला यात्रेचे रूप आले होते. सातारा शहरातील तापमान आज चाळीस अंशाच्या जवळपास पोहोचले होते तरीही आपल्या लाडक्या, जाणत्या राजाच्या समर्थनार्थ कार्यकर्ते व नागरिक तळपत्या उन्हात रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीत अग्रभागी उघड्या जीप मध्ये खा. उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, आमदार श्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे तसेच नक्षत्रच्या संस्थापिका श्री.छ.सौ. दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, रजनी पवार, आदी सहभागी झाले होते. रॅली राजपथावरून कमानी हौद, शेटे चौक मार्गे पोलिस मुख्यालयासमोरून पोवई नाक्यावर आली. याठिकाणी सभेने रॅलीची सांगता झाली. अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेत 'बाहुबली' चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर बांधलेले उदयनराजेंचे प्रचारगीत लक्षवेधी ठरले. "असा हा मैतर, जाणवेना अंतर... जनतेच्या हितासाठी अर्ध्या रात्री धावला", अशा शब्दांत उदयनराजेंच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन या गीतात करण्यात आले आहे. तर "यशाप्रती विनम्रभाव यशवंतभूमी देई, माणसात देव शोधण्याची प्रेरणा देई," अशा शब्दांत सातारा जिल्ह्याच्या मातीचा गुणधर्म वर्णिला आहे. रॅलीत रिक्षावर वाजणा-या या प्रचारगितांची सातारा शहरात मोठी चर्चा होती.


