NEWS & EVENTS

राजकीय

आठवलेंना विधानसभेत योग्य सन्मान देऊ – मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीत जागावाटपावेळी दूर ठेवल्यामुळे रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षासह इतर मित्रपक्ष नाराज होते.

36Fadnvis-Athavale.jpg

मुंबई, दि.19- लोकसभा निवडणुकीत जागावाटपावेळी दूर ठेवल्यामुळे रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षासह इतर मित्रपक्ष नाराज होते. आठवलेंनी आपली नाराजी बोलूनही दाखवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवलेंची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आठवलेंच्या पक्षाचा आता नाही तर विधानसभा निवडणुकीत नक्कीच विचार केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. भाजपाच्या सोशल मीडिया रुमच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आठवले यांना विधानसभेत योग्य सन्मान देऊ असे सांगितल्याने आठवलेंच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान लोकसभा निवडणूक मी ईशान्य मुंबईतून लढावी अशी येथील जनतेची भावना असून, शिवसेनेला ही असे वाटत आहे मात्र ज्यांना वाटावं त्या भाजपला मी ईशान्य मुंबईतून लढावं असं अजून वाटत नसल्याची नाराजी आठवले यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा सरकार स्थापन झाले पाहिजे, अशी जनतेची महाराष्ट्रासह देशभर मानसिकता असून यावेळी राज्यात भारतीय जनता पार्टी,शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह सर्व मित्रपक्षांची महायुती 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक विक्रमी यश मिळवेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लाट होती त्यापेक्षा मोठी लाट या निवडणुकीत मोदीजींच्या पाठिंब्यासाठी आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्याची लोकांची मानसिकता बनली आहे. विविध पक्षांतील प्रभावी नेते भाजपामध्ये येत आहेत. मोदीजींच्या नेतृत्वाखालीच देश प्रगती करेल आणि सुरक्षित राहील, याची या नेत्यांना खात्री वाटते. भाजपा शिवसेनेचे चार संयुक्त कार्यकर्ता मेळावे झाले त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह होता. युतीमध्ये पुन्हा जुना उत्साह संचारला आहे. केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांच्याशी आपली चर्चा झाली असून ते युतीसोबतच आहेत व ते 24 मार्चच्या पहिल्या प्रचारसभेला असतील.

सर्जिकल स्ट्राईकविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलेल्या उलटसुलट विधानांविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की,दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानच्या सीमापार सर्जिकल स्ट्राईक झाले हे संपूर्ण जगाला माहिती आहे. पाकिस्तानवर आलेला आंतरराष्ट्रीय दबावही सर्वांनी पाहिला आहे. पण हे मान्य केले तर खंबीर नेतृत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रेय मिळेल. यामुळे शरद पवार गोंधळलेले आहेत. ते संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत. देशात लोकसभा निवडणुकीत पहिला क्रमांक भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएचाच असेल हे आता विरोधी पक्षांनीही मान्य केले असून त्यांच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा सुरू आहे.