कराड, दि. 13 – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी दुपारी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला. निवडणुकीत आघाडी धर्म म्हणून एकत्र येऊन कॉंग्रेस मदत करते. पण, निवडणुका झाल्या की कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या नरडीवर राष्ट्रवादी पाय ठेवते, असा आक्रमक सूर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आळवला. आघाडी धर्मानुसार कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान राखावा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत वाटा मिळावा, अशा मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली.
सातारा जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने आणि कराड दक्षिण, कराड उत्तर, कराड शहर कॉंग्रेसच्या विद्यमाने येथील हॉटेल पंकज मल्टिपर्पज हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, डॉ. इंद्रजित मोहिते, शिवराज मोरे, हिंदूराव पाटील, जयवंत जगताप, धैर्यशील कदम, धनश्री महाडिक, रजनी पवार, नीलम येडगे, भीमरावकाका पाटील, राजेंद्र शेलार, मनोहर शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, आघाडी करताना दोन्ही पक्षांनी प्रामाणिकपणे केली पाहिजे. कार्यकर्त्याच्या भावना समजून घेण्यासाठी तालुकानिहाय मेळावे घेतले जाणार आहेत. लोकसभेला एकत्र आणि विधानसभेला वेगळे ही भूमिका यापुढे नको. समविचारी पक्ष, नेत्यांनी आपसांतील वाद मिटवून नरेंद्र मोदींची हुकुमशाहीकडे चाललेली सत्ता उलथवून टाकावी. मित्रपक्षाच्या उमेदवार काम पक्षादेश मानून प्रामाणिकपणे करायचे आहे. तसेच कॉग्रेसला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, जिल्ह्यात आमचा भाजप प्रतिस्पर्धी नाही. आमचा विरोधक हा राष्ट्रवादी आहे. छ. उदयनराजे हे आपल्याच पक्षाचे आहेत. ते राष्ट्रवादीत राहून कॉग्रेसचे काम करतात. त्यामुळे कधी ते राष्ट्रवादीचे असल्याचे जाणवले नाही. माढा मतदार संघात विचारविनमय न करता उमेदवारी जाहीर केल्याने राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना माघार घ्यावी लागली आहे. आ. गोरे म्हणाले, आमचा दुश्मन हा राष्ट्रवादी आहे. तरीही आम्ही पक्षाचा व पृथ्वीराजबाबांचा आदेश मानून राष्ट्रवादीला लोकसभेला मदत करणार आहोत. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचे स्थान काय हेही मित्र पक्षाने सांगावे. यापुढे कॉग्रेस पक्षाला डावलून चालणार नाही. अन्यथा आघाडी गृहीत धरू नये. सातारचा खासदार ठरविण्याची ताकद ही कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यात आहे. माढाचा खासदार माण, खटाव व फलटणचे कार्यकर्ते ठरवतील. कॉग्रेस पक्षातून जाणाऱ्यांनी जाताना नांवे ठेवून जावू नये, त्यांना बाबांनी भरभरून दिले आहे, असा टोला मदन भोसले यांचे नाव न घेता टोला आ. गोरेंनी लगावला
राजकीय
निवडणुका झाल्या की राष्ट्रवादी मुस्कटदाबी करते
कराडातील मेळाव्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा सूर


