NEWS & EVENTS

राजकीय

पहिलं भाषण का ट्रोल झालं? पार्थ अजित पवार म्हणतात….

एका मुलाखतीत अखेर त्या भाषणाच्यावेळी काय घडलं ते पार्थ पवार यांनी स्पष्ट केले आहे

36parth-pawar-1.jpg

पुणे, दि.29- मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांचं पहिलं भाषण चांगलंच ट्रोल झालं, आता ते का ट्रोल झालं याचं कारण पार्थ पवार यांनीच सांगितलं आहे. पार्थ पवार यांच्या भाषणाची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. पार्थ पवार बोलायला उभे राहिले तेव्हा ते अडखळले. त्यांचे काही शब्द चुकले ज्यानंतर त्यांच्या या भाषणाची खिल्ली उडवली गेली. आता असं नेमकं का घडलं हे दस्तुरखुद्द पार्थ पवार यांनीच सांगितलं आहे.

मावळमध्ये माझं ते पहिलंच भाषण होतं. त्यापूर्वी एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर मी कधीही बोललो नव्हतो. त्या भाषणाला सात ते आठ हजार लोक उपस्थित होते. शिवाय दादा (अजित पवार), साहेब (शरद पवार) यांच्यासह इतर अनेक मान्यवर नेते मंचावर होते. त्यामुळे बोलताना काही शब्द मी गिळले. विरोधकांनी त्याचाच व्हिडिओ तयार केला आणि मला ट्रोल केलं. मी बोलताना काही चुका केल्या हे मान्य आहे, पण पहिलंच भाषण असल्याने मी अडखळलो होतो आणि काहीसा घाबरलो होतो त्यात फारसं काही वावगं नाही. मात्र विरोधकांनी चुकांचा व्हिडिओ तयार करून मला ट्रोल केलं असं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मावळमध्ये जेव्हा त्यांनी भाषण केले तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणात सत्ताधारी पक्षावर टीकेचे ताशेरे झाडले. हे सरकार केवळ डिजिटल सरकार आहे. या सरकारच्या काळात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि भ्रष्टाचार यामध्ये वाढ झाली अशीही टीका त्यांनी केली. काही चुकामुका झाल्यास सांभाळून घ्या असा उल्लेख त्यांनी केला. यावरूनच ते चांगलेच ट्रोल झाले. मात्र आता यामागे विरोधकांनी हे सारेकाही जाणीवपूर्वक केल्याचा आरोप पार्थ अजित पवार यांनी केला आहे.