NEWS & EVENTS

राजकीय

प्रियंका गांधी मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवण्यास उत्सुक

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांना रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची विनंती केली़ होती, यावर प्रियंका गांधी म्हणाल्या...

88priyanka-gandhi-modi.jpg

वाराणसी, दि.29- काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी- वढेरा या वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यासाठी कारणीभूत ठरले आहे ते प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना विचारलेला प्रश्न. प्रियंका गांधी यांनी सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी विनंती काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. यावर प्रियंका गांधी यांनी ‘वाराणसीतून निवडणूक का लढवू नये?’ असा प्रतिप्रश्न केला आणि कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला.

प्रियंका गांधी यांनी गुरुवारी सोनिया गांधी यांचा मतदार संघ असलेल्या रायबरेलीत काँग्रेसचा प्रचार केला. रायबरेलीत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, आज माझ्या आईला वाईट वाटत होते. कारण ती तुम्हाला भेटायला रायबरेलीत येऊ शकली नाही. यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांना रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची विनंती केली. यावर प्रियंका गांधी हसत हसत म्हणाल्या, निवडणूक लढवायचीच असेल तर मग वाराणसीतून का नाही?. प्रियंका गांधी यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

शुक्रवारी प्रियंका गांधी या अयोध्येत जाणार आहे. प्रियंका गांधी या हनुमान गढी येथील मंदिरात पूजा करतील आणि यानंतर रोड शोमध्ये सहभागी होतील. शुक्रवारी सुमारे साडे पाच तास प्रियंका गांधी या अयोध्येत असतील. मात्र, त्या रामलल्ला येथे दर्शनासाठी जाणार नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी हनुमान गढी येथील मंदिरात पूजा केली होती. मात्र, ते देखील रामलल्ला येथे गेले नव्हते. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांचा बचाव करताना वादग्रस्त जागेवर राहुल गांधी यांनी जाणे योग्य ठरले नसते, असे म्हटले होते. आता प्रियंका गांधी या देखील अयोध्येत गेल्या असून सुप्रीम कोर्टाने अयोध्येतील खटल्याप्रकरणी मध्यस्थ नेमले असताना प्रियंका गांधी या अयोध्येत पोहोचल्या आहेत.