NEWS & EVENTS

राजकीय

कचरा डेपोचा प्रश्न मार्गी न लागल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार

खा. भोसले यांना ग्रामस्थांचे निवेदन

80karad-9.jpg

नवारस्ता,दि. 16- – पाटण नगरपंचायतीने बेकायदेशीरपणे केलेल्या घनकचरा डेपोचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा पाटण येथील प्रभाग क्रमांक 9 व 10 मधील सह्याद्रिनगर मेष्टेवाडी येथील नागरिकांनी दिला. श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले हे गुरुवारी पाटण दौऱ्यावर आले असता नागरिकांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेत याबाबतचे निवेदन दिले.

देशात स्वच्छता नांदावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे. मात्र पाटण नगरपंचायत त्याला अपवाद ठरली आहे. पाटण नगरपंचायतीने प्रभाग क्रमांक 9 व 10 च्या परिसरामध्ये नागरी वस्तीपासून 100 मीटर अंतरावर घनकचरा डेपो तयार करण्यात आला आहे. या घनकचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घनकचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांचा उपद्रवही वाढला होता. तसेच प्लॅस्टीक वाऱ्याने उडून शेजारील शेतजमिनींमध्ये जाऊन जमीन नापिक होत आहेत. याबाबत अनेक वेळा नागरिकांनी नगरपंचायतीकडे तक्रारी दिल्या. परंतु नगरपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

गत आठवड्यात यासंदर्भात नागरिकांनी नगरपंचायत कार्यालया शेजारी तीन दिवस उपोषण केले. तिसऱ्या दिवशी तहसीलदार रामहरी भोसले यांच्या मध्यस्थीने नागरिकांनी उपोषण मागे घेतले. परंतु जोपर्यंत कचरा डेपोचा प्रश्‍न मिटत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. दरम्यान, गुरूवारी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे पाटण दौऱ्यावर आले असता नागरिकांनी त्यांची भेट घेत कचरा डेपोचा प्रश्‍न मांडला. जोपर्यंत हा प्रश्‍न निकाली लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असून आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला.


https://www.youtube.com/embed/