NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

खासदार उदयनराजेंना पुन्हा पक्षाने उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नाही

नगरविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा इशारा

10shivendraje-min.jpg

सातारा, दि.6 - ‘खासदार उदयनराजे भोसले यांचा विकासकामांत परफॉर्मन्स नाही, त्यांच्याबाबत विश्‍वासार्ह परिस्थिती नाही. आज एक बोलतील, उद्या दुसरेच करतील. त्यामुळे पक्षाने त्यांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी देऊ नये,’’ अशी मागणी नगर विकास आघाडीच्या पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य व आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज करण्यात आली.

नेहमी पक्षाला वेठीस धरणाऱ्यांना, पक्षाशी कोणतीही बांधिलकी नसणाऱ्यांनाच राष्ट्रवादीतून सपोर्ट केला जात असेल, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सरळ भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, अशी मागणीही या वेळी पुढे आली.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांची बैठक काल (ता. ४) औद्योगिक वसाहतीत झाली. पक्षाकडून उमेदवारी जाहीर होत नाही, योग्य वागणूक मिळत नाही, त्यामुळे उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी त्यात पुढे आली होती. त्यानंतर आज नगर विकास आघाडीच्या पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांची साताऱ्यात बैठक झाली. त्या वेळी नगरसेवक अशोक मोने, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, अविनाश कदम, शेखर मोरे-पाटील, बाळू खंदारे, जिल्हा परिषद सदस्य जयवंत भोसले, प्रकाश बडेकर, हेमंत कासार, काही नगरसेविका व शहरातील प्रमुख कार्यकर्ते व आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. ग्रामीण भागातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अगोदरच उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध केला होता.

त्यांनी थेट शरद पवार यांच्यासमोर जाऊन गाऱ्हाणे मांडले होते. आज शहरातील समर्थकांनी व मार्गदर्शकांनीही या बैठकीत तीच री ओढली.

उदयनराजे पक्षाशी असणारी कोणतीही बांधिलकी मानत नाहीत, प्रत्येक वेळी पक्षाला अडचणीत आणण्याचे काम करतात. तरीही पक्ष त्याची का दखल घेत नाही, असा प्रश्‍न सर्वच कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. मागील वेळी निवडणुकीत त्यांना मदत केली. त्यानंतर त्यांनी नगरपालिका निवडणुकीत अडचणी निर्माण केल्या. विधानसभेलाही ते अडचणी निर्माण करणारच, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. उदयनराजे अजिबात विश्‍वासार्ह नाहीत. आज म्हणतील मनोमिलन करूया आणि उद्या काही तरी कारण काढून ते तोडायला पुढे होतील. ते बोलतात एक आणि करतात दुसरेच. जिल्ह्याच्या विकासकामांत त्यांचा सहभाग नाही. लोकांमध्येही त्यांच्याबाबत असंतोष आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ नये.

शिवेंद्रसिंहराजे यांनीही त्याबाबत आग्रही राहावे, अशी भूमिका सर्वांनी मांडली. शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले तरीही आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका बहुतांश जणांनी घेतली. त्याचबरोबर पक्षाने निष्ठावंतांची दखल घेतली नाही, तर शिवेंद्रसिंहराजेंनी थेट भाजपत प्रवेश करावा, अशी भूमिकाही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मांडली.

शरद पवार यांना भेटणार
आजच्या बैठकीत ठरलेला हा निर्णय शिवेंद्रसिंहराजेंच्या कानावर घालण्यात येणार आहे. तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांचीही यासंदर्भात भेट घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.