NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

पाटणमध्ये निसर्गपूजेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

74patan.jpg

पाटण, दि. 15- पाटण तालुक्यातील मणदुरेच्या डोंगरपठाराजवळ खिंडी नजीकच्या काऊदऱ्यावर जेजुरी जानाईदेवीचे भक्तगण आणि कराड, पाटण व तारळे परिसरातील हजारोंच्या संख्येने निसर्गप्रेमींनी झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देत आज सकाळच्या निसर्गपूजेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. विधीवत निसर्गाला नारळ अर्पण केला आणि जानाईदेवीच्या नावाने चांगभलंच्या गजरात निसर्गप्रेमी व भाविकांनी कड्यावरून गुलाल-भंडाऱ्याची उधळण केली.

पाटण तालुका पत्रकार संघाच्यावतीने काऊदऱ्यावर जेजुरीच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी जेजुरीच्या नगराध्यक्षा विनाताई सोनवणे, जानाईदेवी अन्नदान सेवा ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण बारबाई, निसर्गपूजा प्रवर्तक विजयकुमार हरिश्चंद्रे, विनय गुरव, पाटण तालुका पत्रकारसंघाचे उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, माजी अध्यक्ष विक्रांत कांबळे, सचिव विद्या म्हासुर्णेकर-नारकर, राजेंद्र सावंत, विजया म्हासुर्णेकर, मनसेचे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर, संस्थापक राजेंद्र बारबाई, जेजुरीचे बाळकृष्ण बारबाई, रमेश बयास, शिवाजी कुतवळ, रत्नाकर मोरे, रवी बारबाई, यादवराव देवकांत, शोभा कदम, शशिकला हादवे, इंगवलेमॅडम, शेडगेमॅडम, खाशाबा चव्हाणआदी उपस्थित होते.

निसर्गातील पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, मोठ्या प्रमाणावर होत असलेली जंगलतोड रोखली जावी. आपल्या आजुबाजूचा परिसर निसर्गसौंदर्य टिकून राहण्यासाठी वृक्ष संवर्धनासाठी आवाहन करत जेजुरी येथील ग्रामस्थांनी राज्याला जागृतीचा अनोखा संदेश देणारी निसर्गपूजा हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत जानाईदेवी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केली. यावेळी जेजुरी येथील अभिषेक बावळे, वैभव रसाळ, विक्रम यादव यांनी तयार केलेल्या ड्रोनच्या सहाय्याने सोहळ्याप्रसंगी पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जानाईदेवी पालखी पदयात्रा अन्नदान सेवा ट्रस्टच्यावतीने अन्नदान करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते परिसरातील महिलांना वनदेवी मानून साडी-चोळी वाटप करण्यात आली. त्यानंतर जेजुरीच्या पालखीचे निवकणेच्या दिशेने प्रस्तान झाले. काऊदऱ्यावरील सोहळा पार पडल्यानंतर डोंगरपठारावर स्वच्छता मोहीम राबवून प्लॉस्टीकची होळी करण्यात आली.

जेजुरी येथून दरवर्षी पायी चालत जानाईदेवीच्या मंदिरापर्यंत पालखी येत असते. जेजुरी, पुणे जिल्ह्यासह मुंबईपासुन हजारो भाविक निवकणेच्या जानाईदेवीच्या यात्रेत सहभागी होतात. निसर्गपुजेनंतर पालखीचे निवकणे मंदिराकडे पायवाटेने प्रस्थान झाले. निवकणे येथे पालखीचा तीन दिवस मुक्काम असून अन्नदान सेवा ट्रस्टच्यावतीने तेथे येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद व अन्नदान केले जाते.


https://www.youtube.com/embed/