NEWS & EVENTS

राजकीय

आयुष्यात पहिल्यादांच काठी गाव तुम्हाला दिसले

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा आ. देसाई यांना टोला

39vikram-patankar.jpg

पाटण, दि. ६ – काठी अवसरी, काठी टेक, वनकुसवडे, मरड या गावांना तुमच्यापैकी कोणी कधी भेटी दिल्या होत्या का? त्यापैकी कोणीही या डोंगरमाथ्यावरील गावाकडे ढुंकूणही कधी बघितले नाही. तुम्हीसुध्दा गेल्या 25 वर्षात या गावांना कधी भेटी दिल्या होत्या का? हे एकदा तारखेसह जाहिर करा. आता निवडणुका जवळ आल्यामुळे तुम्हाला या डोंगर पठारावरील गावांचा शोध लागला आहे. दुर्गम डोंगर माथ्यावर असलेल्या गावात यापूर्वी तुम्ही कधीच गेला नाही.त्यामुळे तुम्हाला तिथे गावे आहेत हे सुध्दा माहित नव्हते. पवनचक्की कंपनीच्या खर्चाने ज्यावेळी याविभागातील रस्त्यांची कामे करीत होतो. तेव्हा या डोंगरात माणसे राहतात का? याची सुध्दा माहिती घेण्याचे कष्ट तुम्ही कधी घेतले नाहीत.

पवनचक्कीकडे जाणारे रस्ते आम्ही तयार करीत होतो त्यावेळी तुम्ही या रस्त्यांच्या कामांना विरोध करीत होता. आणि आता त्याच रस्त्यावरून जावून कामे झाली नाहीत म्हणून मापे काढत आहात. त्या काळात शेकडो कोटीचे रस्ते केले म्हणून तुम्ही काठी गावात जावू शकला याचे तरी भान ठेवा, असा टोला माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी आ. देसाई यांना लगावला. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गेल्या 40 वर्षात दुर्गम डोंगराळ भागातील रस्ते करण्यासाठी झगडलो. डोंगरपठारावरील गावातील विकासकामे करीत असताना तेथील लोकसंख्येचा मी कधीच विचार केला नाही. त्यामुळेच आज त्या गावाकडे जाणारे रस्ते चांगले दिसतात. त्याच रस्त्यावरून जावून माजी मंत्र्यांनी काय केले म्हणून विचारता? अहो माजी मंत्र्यांनी रस्ते केले म्हणून तुम्ही डोंगरमाथ्यावरील गावातून फिरू शकता.

डोंगरमाथ्यावरील अनेक गावांमध्ये चांगले रस्ते आहेत. म्हणून तर तुम्ही दुसर्‍याला एखाद्या रस्त्यांच्या भुमिपूजनाला पाठवून देता. त्यामुळे या रस्त्यांची कामे कोणी केली हेही तुम्हाला माहित नाही. आत्तापर्यत आयत्या पिठावर नागोबा म्हणून बसलेला आहात याचे भान ठेवा. गावागावात दारूडी माणसे शोधून त्यांना दारू आणि मटण खाऊ घालण्यासाठी पथक नेमण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही. सत्ता मिळविण्यासाठी काहीही करणे हे तुमचे धोरणच आहे. ऊसाच्या पट्ट्यातील लोकांचे जीवन उध्वस्त करून आता डोंगरपठारावरील जनतेच्या मागे लागला आहात. हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. ऊसाच्या पट्ट्यातून शेतकर्‍यांनी हकालपट्टी केल्यामुळे आता वाड्या वस्त्यावरील लोकांत भांडणे लावण्याचा तुम्ही उद्योग सुरू केला आहे. हे आता जनतेच्या लक्षात आले आहे.

आमच्याच जिल्हा परिषद सदस्यांनी मंजूर केलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या कामाचे भूमीपूजन करून फुकटचे श्रेय घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेत आमचीच सत्ता आहे. जिल्हा नियोजन समितीमध्येही आमच्याच कार्यकत्याचे बहुमत आहे. त्यामुळेच ग्रामस्थांना विकासाची कामे मिळत आहेत. कोणत्याही कामाचे भुमीपूजन केले म्हणजे श्रेय मिळत नाही. कामाचे श्रेय हे जिल्हा परिषदेचे आहे. यापूर्वीच आम्ही काठी अवसरी याठिकाणी कोट्यावधी रूपयांचे पाझर तलाव बांधले. याची तुम्हाला माहिती नाही .ती माहिती अगोदर करून घ्या. पोत्याने निधी मंजूर केला म्हणूनच रस्त्याची कामे होवून आज तुम्ही काठी गावापर्यत पोहचू शकला.

तुम्ही भूमीपूजन केलेल्या पाटाचे काम आमच्याच अधिकारात जिल्हा परिषदेने केले आहे. काठी अवसरी गावांना जोडणार्‍या रस्त्याच्या कामासाठी यापूर्वीच 3.50 कोटी रूपयाचा निधी मंजूर केला आहे. परंतु कोयना अभयारण्यातून 14 गावे वगळण्याच्या प्रक्रियेमुळे काम थांबले आहे. यापूर्वी आम्ही कोयना अभयारण्यातून 14 गावे वगळण्यासाठी मोर्चे, उपोषणे, आंदोलने केली आहेत.त्यामुळे आता लवकरच कोयना अभयारण्यातून 14 गावे वगळण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाली की सदरच्या रस्त्याचे काम होणारच आहे. त्यासाठी तुमच्या निधीची आवश्यकता नाही असेही ते म्हणाले.