NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

जिल्हा परिषदेच्या ९९ कोटी ८८ लाख रूपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी

37ZP.jpg

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे सन 2019 व 20 चे मुळ अंदाजपत्रक 44 कोटी 98 लाख रूपये व पुरवणी अंदाजपत्रक 54 कोटी 90 लाख असे मिळून 99 कोटी 88 लाख रूपयांच्या अंदाजपत्रकाला विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामध्ये सर्वच विभागाला झुकते माप देण्यात आले असून त्या त्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेस उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती राजेश पवार यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करताना बांधकाम, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, लघुपाटबंधारे, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण यासह विविध विभागावर विशेष भर दिला आहे. राजेश पवार म्हणाले, स्वनिधीचे पुरवणी अंदाजपत्रक 99 कोटी 88 लाख रूपयांचे सादर केले असून 12 लाख रूपये शिलकीचे अंदाजपत्रक मांडले आहे. या अर्थसंकल्पात सामान्य प्रशासनला 3 कोटी 19 लाख 40 हजार रूपयांची तरतूद केली आहे. शिक्षण विभाग हा ग्रामीण जनतेच्या विकासाचा कणा आहे त्यासाठी 9 कोटी 25 लाख रूपयांची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक सौर शाळा तयार करणे, प्राथमिक शाळांसाठी डिजीटल क्‍लासरूम, संगणक, ई लर्निंगला प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जनतेचे दैंनदिन जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यासाठी 25 कोटी 65 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य चांगले रहावे यासाठी 4 कोटी 65 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या विभागामार्फत माहेरवाशीण प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन योजना हाती घेण्यात आली आहे.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. जिल्ह्यातील 70 टक्के जनतेचे जीवनमान कृषी उत्पन्नावर आधारीत आहे. त्यामुळे कृषी विभागासाठी 5 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सर्व जनतेचा समान विकास, सर्वाना विकासास समान संधी या तत्वानुसार समाजकल्याण विभागासाठी 5 कोटी 94 लाख 77 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग कल्याण निधीसाठी 2 कोटी 55 लाख 21 हजार रूपयांची तरतूद केली असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले. महिला व बालकल्याण विभाग हा महत्वाचा विभाग असल्याने त्यासाठी 2 कोटी 53 लाख 16 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नाविन्यपूर्ण योजनांसाठी भरीव तरतूद

प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल क्‍लासरूम, ई लर्निंग, जि.प. व पं.स. मालकीच्या जागा विकसीत करणे, माहेरवाशीन आरोग्य केंद्र योजना, मुक्त संचार गोठा, कोंबड्या वाटप,दिव्यांग खेळाडू, शाळा स्वच्छता संवर्धनासाठी डस्टबीन,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना युपीएससी व एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन, कुस्ती स्पर्धा , पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण,नव्याने पीक स्पर्धा विजेत्या शेतकर्‍यांना प्रोत्साहन,दिव्यांग खेळाडूसाठी प्रोत्साहनपर अनुदान या नाविन्यपूर्ण योजनांसाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे.