सातारा : शिवतीर्थ पोवईनाका येथील आवारात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, कै. ना. यशवंतराव चव्हाण पुतळा परिसरात नो- फ्लेक्स झोन बाबत झालेल्या पालिकेने ६ जानेवारी २०२३ रोजी प्रशासकीय ठराव नं. ७७५ केला आहे परंतु तरीही याठिकाणी वारंवार बोर्ड लावण्यात येतात. अनेकवेळा बोर्ड काढून नेणे, संबंधितांना नोटीसा काढणे एवढीच कारवाई होती परंतु आजपर्यंत कोणावरही दंडात्मक कारवाई झाल्याचे निदर्शनास आलेले नाही, त्यामुळे नो फ्लेक्स झोनची अंमलबजावणी कडकपणे करावी, अन्यथा शिवजयंती दिनी दि. १९ फेब्रुवारी रोजी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा सातारा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
निवेदनात, स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून सातारा शहराचा नावलौकीक आहे. सातारा शहरातील पोवईनाका येथील शिवछत्रपतींचा पुतळा परिसर हा संपूर्ण महाराष्ट्रात शिवतीर्थ म्हणून ओळखला जातो. हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणा देणारे आहे. परंतु सध्या या परिसराला कायमपणे फ्लेक्स, जाहिरातींनी विळखा घातलेला आहे. या परिसरात लावण्यात येणारे बोर्ड आपल्याकडून अनेकवेळा काढून नेणे, व संबंधीतांना नोटीसा काढून त्यांच्यावर कारवाई करणे इथपर्यंतच सर्व बाबी केल्या जात असल्याचे दिसत आहे. पालिकेने प्रशासकीय ठराव क्र. ७७५ दि. ०६/०१/२०२३ नुसार साता-यातील बहुतांशी ठिकाणी नो फ्लेक्स झोन करण्याकामी ठराव घेण्यात आला आहे. त्यामध्ये जाहिराती संबंधी अस्तित्वात असलेले कायद्यानुसार कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाने सुचित केले आहे. त्यानुसार ठरावान्वये नो फ्लेक्स बोर्ड झोन करण्याचा ठराव केला आहे. परंतु, फक्त ठराव केला गेला असून त्यावर आज पर्यंत कोणावरही दंडात्मक अथवा तरतुदीनुसार कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत नाही. प्रत्यक्षात नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत परंतु वसुली कमी प्रमाणात आहे. काही लोकप्रतिनिधी यांचे 'चमको कार्यकर्ते'' भावी, आजी-माजी नगरसेवक, काही संघटना, पक्ष यांचे भले मोठे फ्लेक्स लावून शिवतीर्थ परिसर झाकोळला जात आहे. अधिकारी कारवाई करण्यास गेले असता लोकप्रतिनिधोंचे नांव सांगून दमदाटी केली जाते. त्यामुळे हातबल अधिकारी कोणतीही कारवाई न करता परत येतात.
याकामी प्रशासनाने प्रशासकीय क्र. ७७५ दि. ६/१/२०२३ कायमचा रद्द करावा आणि शिवतीर्थ परिसरात लावलेला जाहिरात बोर्ड फक्त शोकेस बनला आहे तो तात्काळ काढावा. अन्यथा प्रशासनाने धमक दाखवून ठराव क्र. ७७५ ची नो फ्लेक्स बोर्ड झोनची कारवाई कोणाच्याही दबावाखाली न येता करून दाखवावी. शिवतीर्थ परिसरात नो फ्लेक्स झोनची अंमलबजावणी दि. १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावी अन्यथा शिवजयंती दिवशी म्हणजे दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री.छ.शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. मोरे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे विभागीय आयुक्त, सातारा जिल्हाधिकारी, सातारा शहर पोलीस निरीक्षकांना पाठवण्यात आल्या आहेत.
...तर शिवतीर्थावर शिवजयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन करणार
नो फ्लेक्स झोन अंमलबजावणीसाठी सुशांत मोरे यांचा इशारा

