सातारा : महाबळेश्वर, पाचगणी येथील ज्या १४ जणांची अनधिकृत बांधकामे आहेत त्याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे परंतु जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करायची सोडून इतर बांधकामांवर कारवाई करत आहे. जिल्हा प्रशासनाने ज्या १४ जणांची जी यादी दिली आहे त्यांच्यावर १५ दिवसांत कारवाई करावी, अन्यथा हरित न्यायालयात जाणार असल्याची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना 1 जानेवारी रोजी पाठवली असल्याची माहिती सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकात, महाबळेश्वर- पाचगणी परिसरात अनेक हॉटेल, फॉर्म हाऊस, रेस्टारंटची अनधिकृत बांधकामे आहेत. माहिती अधिकारातंर्गत काढलेल्या कागदपत्रांवरुन ते स्पष्ट झाले आहे. यामध्ये हॉटेल क्लिफ, हॉटेल ब्राईट लॅन्ड, जांभळे कॉटेज, मनिषा शेडगे, मंचरजी बाटलीवाला, गौरव रुद्रकांतेश्वर, सचिन बाराई, प्रितमदास जेरा, शुभांगी देवकर, बाबुराव कदम, सागर डोईफोडे, स्नेहल तागडे, मॅप्रो गार्डन, हॉटेल ऑक्सिजन, सलील बाराई, सागर डोईफोडे, मॅप्रो फूड प्रा.लि. यांचा समावेश आहे. या सर्वांनी इको सेनिसिटव्हमध्ये नियमबाह्य आणि अनधिकृत बांधकामे केली असून पर्यावरणांचे नुकसान केले आहे. यापूर्वी या संबंधितांना जानेवारीमध्ये ॲड. तृणाल टोणपे आणि ॲड. निकिता आनंदाचे यांच्यामार्फत अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत तसेच दंड भरण्याबाबत नोटीसा पाठवल्या होत्या. तसेच त्यावेळी जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, श्री महाबळेश्वर देवस्थान,पाचगणी मुख्याधिकारी, यांच्याकडे या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु कोणीच त्याला प्रतिसाद दिलेला नाही. जिल्हा प्रशासन या संबंधितांवर कारवाई करायची सोडून दुसऱ्याच बांधकामांवर कारवाई करुन यांना संरक्षण देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांनी या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करुन योग्य ती कृती करावी अन्यथा हरित न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही श्री. मोरे यांनी दिला आहे.

जिवे मारण्याची धमकी

ज्या १४ जणांवर कारवाईची मी मागणी केली आहे त्यापैकी काहीजण माझा फोटो वाई, महाबळेश्वर, पाचगणी, सातारा परिसरात दाखवून चौकशी करत असून यांना मारणार असल्याचे सांगत असल्याचे मला समजले आहे.  त्यांना माझी विनंती आहे,माझा नंबर ९८५०४१११६३ हा असून संबंधितांनी फोन करुन शिवतीर्थ, हुतात्मा स्मारक, फाशीचा वड येथे वेळ आणि तारीख सांगावी तिथे मी येण्यास तयार असून तिथे काय बघायचे ती बघा, मरणाला घाबरत नाही, मी मरेन पण माझे विचार जिवंत राहतील, अन्याय, अत्याचार, भ्रष्टचार, आणि पर्यावरण या विषयावर मी आवाज उठवणारच अशी प्रतिक्रिया सुशांत मोरे यांनी दिली.कास अनधिकृत बांधकामे, इको सेन्सिटिव्ह झोन मधील बोगस दस्तऐवज, आदनी समूह, धरण परिसरातील फार्महाऊस व हॉटेल्स अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत त्यामुळे माझ्या जिविताला काय झाल्यास त्याला जिल्हा प्रशासन आणि संबंधित बांधकाम मालक जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे.