सातारा, दि. – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याा कार्यकालात झालेल्या सर्व निविदा तसेच त्यांच्या कारभाराची त्वरित चौकशी करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने 29 ऑगस्टपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे येथील निवासस्थानासमोर करण्यात येणारे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांच्या मनमानी, भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराबाबत नेहमीच तक्रारी होत असतात परंतु तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांना निलंबित करावे अन्यथा 29 ऑगस्टपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे येथील निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिका-यांना निवेदनाव्दारे दिला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्हा दौ-यावर आले असताना याबाबत त्यांना भेट घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली. त्यात मुख्यमंत्र्याच्या जिल्हयात भ्रष्ट, मनमानी व भोंगळ कारभार करणा-या डॉ. सुभाष चव्हाण यांच्याबाबत अनेक तक्रारी असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाही. तसेच मृत्यू दर, माता बालसंगोपन, एक्सरे मशीन नादुरुस्त असणे, खोटया वैद्यकीय बिलावर सह्या, छोटे मोठे ऑपरेशन, दिव्यांगाचे दाखले, मिटींगच्या नावाखाली फोन न उचलणे, मुंबई व पुणे येथील बैठका याची कारणे देऊन कार्यालयात हजर न राहणे या सर्व गोष्टी चिंतेचा विषय आहे. लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नाही. जिल्हयाला 2019 साली मेडिकल कॉलेज मंजूर झाले असून तसा शासन निर्णयही झाला आहे. शासन निर्णयानुसार ज्या जिल्हयामध्ये मेडिकल कॉलेज मंजूर होऊन ते सुरु होते त्यावेळेस जिल्हा शल्यचिकित्सक हे पद बरखास्त होते. गेले तीन वर्षे कॉलेज मंजूर होऊन सुरु झाले तरीही हे पद बरखास्त केले नाही. वास्तविक हे पद बरखास्त होऊन त्याचा चार्ज मेडिकल कॉलेजचे अधिष्ठताकडे देणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही. त्यामुळे डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासारखे जिल्हा शल्यचिकित्सक निलंबित करावेत व या पदाचा चार्ज कॉलेजच्या अधिष्ठतांकडे तात्काळ द्यावा या मागण्या करण्यात आल्या. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांच्या कार्यकालातील सर्व निर्णयांची चौकशी करण्यात येईल तसेच इतर मागण्यांबाबत ठोस कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले, त्यामुळे 29 ऑगस्टपासून दरे (ता. महाबळेश्वर) येथे करण्यात येणारे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वनसानंतर उपोषण तात्पुरते स्थगित – सुशांत मोरे
जिल्हा शल्यचिकित्सकांना निलंबित करण्यासाठी दिला होता इशारा

