सातारा – सातारा नगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांच्या कामकाजाबाबत अऩेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कामचुकारपणा, निविदामध्ये भ्रष्टाचार, खोटे अहवाल तयार करणे यासारख्या तक्रारीचा समावेश आहे. तरी सातारा पालिकेच्या मुख्याधिका-यांनी आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांना तातडीने निलंबित करावे, अन्यथा सातारा पालिकेसमोर 1 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी मुख्याधिका-यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात, सागर बडेकर यांच्याबद्दल तक्रारी असूनही मुख्याधिकारी राजकीय दबावापोटी कारवाई करत नाहीत. ते भागात आहेत असे सांगून प्रत्यक्षात घरी असतात, वॉर्ड अथवा प्रभागात दुपारनंतर नसतानाही त्यांच्यावर अंकुश नाही. स्पॉटवर कचरा कसा पडतो त्याचे निरीक्षण करण्याकामी निविदा काढली आहे. 7 ते 8हजार दंडाची रक्कम झाली असताना संबंधित ठेकेदाराला 10 लाखाचे बिल अदा करण्यात आले आहे, याची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित ठेकेदाराकडून संबंधित बिलाची दंड, व्याजासहित वसुली करावी. कचरा डेपोवर नगरपालिकेचा कर्मचारी श्री.बडेकर यांचा भाऊ काम पाहत आहे. वास्ताविक कचरा डेपोचा ठेका दिला गेला आहे. मग तिथे कर्मचारी नेमण्याचा खटाटोप कशासाठी ? नाले, ओढे स्वच्छतेसाठी बांधकाम विभागाकडून जेसीबी असताना, पालिकेच्या मालकीचे जेसीबी असताना श्री.बडेकर यांनी खासगी जेसीबी आरोग्य विभागामार्फत लावण्याचे कारण काय ? खोटे अहवाल तयार करुन श्री.बडेकर यांनी श्री.जाधव नामक व्यक्तीला सोसायटीमार्फत ठेका देऊन स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेतला आहे, त्याची चौकशी होऊन जेसीबीची बिले अदा करु नयेत. मैला सकक्षण गाडी पालिकेच्या मालकीची आहे, ती गाडी श्री.जाधव, कांबळे नामक व्यक्तींना सोसायटीमार्फत 80 हजार डिझेल, मेटेनन्ससहित महिना चालवण्याकामी दिली आहे. त्यातून 9 लाख 60 हजाराचा निविदा काढली आहे, ती रद्द करावी. ती न झाल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल. गेल्या दोन वर्षातील आरोग्य विभागातील दहा लाखाच्या आतील सर्व निविदांची सखोल चौकशी व्हावी. तसेज ज्या ठेकेदारांना कामे दिली आहेत, त्यांना काळ्या यादीत टाकावे. ही बिले काढणा-या सागर बडेकर यांच्या मालमत्तेची, बँक खात्याची, कॉल रेकॉर्ड, सीडीआर तपासून निलंबन करावे अन्यथा पालिका कार्यालयासमोर दि. 1 सप्टेंबर रोजी आत्मदहन करावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे.
पालिका मुख्याधिका-यांनी आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांना निलंबित करावे
1 सप्टेंबरला आत्मदहन करण्याचा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा इशारा

