किसन वीर’च्या विद्यार्थ्याचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होणार
वाई / प्रतिनिधी
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रज्ज्वल जाधव या विद्यार्थ्याचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होत असून, लहान वयातच कवितेसारख्या साहित्यप्रकाराची वाट धुंडाळल्याबद्दल महाविद्यालयीन वर्तुळात त्याचे कौतुक होत आहे. प्रज्ज्वल सध्या इयत्ता १२ वी कला शाखेत शिकत आहे.
या प्रवासाबद्दल त्याच्याशी संवाद साधल्यावर तो म्हणाला, ‘आठवीत असताना मी पहिल्यांदा ‘मरण मात्र स्वस्त झालंय!’ ही कविता लिहिली. आसपासच्या वातावरणाबद्दल मला काहीतरी बोलायचंय अशी तीव्र भावना मनात होती. त्या भावनेला कवितेने वाट मोकळी करून दिली.’ त्याच्या कवितांमध्ये सामाजिक वास्तव आणि मानवी भावभावना या दोन्हीचा समतोल जाणवतो. निवृत्त शिक्षक बाळासाहेब कोकरे यांसारख्या व्यक्तीचित्रणात्मक कवितांतून त्याची निरीक्षणशक्ती व मांडणीची ताकद दिसून येते.
या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी प्रज्ज्वलचे विशेष कौतुक करत, त्याच्या कवितांतील विषयाची निवड, विचारांची प्रगल्भता आणि समाजाकडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी याची दखल घेतली. कमी वयातच भाषेवर पकड ठेवून आशय व भाव पोचवण्याची क्षमता, तसेच सातत्याने स्वतःला घडवत नेण्याची जिद्द हे आश्चर्यकारक पण आनंददायक असल्याचे ते म्हणाले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी अभिनंदन करताना, कविता ही मूल्यजाणीव, विचारशक्ती आणि संवादकौशल्य वाढवणारी कला असल्याचे नमूद केले आणि कला शाखेतून असे हिरे घडत आहेत याबद्दल आनंद व्यक्त केला.
या लेखनप्रवासात प्रज्ज्वलला निवृत्त शिक्षक बाळासाहेब कोकरे सरांचे मार्गदर्शन लाभले. तसेच श्रीमती दीपाली भागवत यांनी कवितेची भाषा, आशय आणि सादरीकरणाबाबत सातत्याने प्रेरणा देत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य व पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव, ज्येष्ठ प्राध्यापक श्रावण पवार आणि सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रज्ज्वलचे अभिनंदन केले.
तुमच्या बातम्या, प्रतिक्रिया, मत व्यक्त करण्यासाठी उजव्या हाताकडील व्हॉटसअप बटनवर क्लिक करा

