वाई : शिक्षण, शाळा महाविद्यालयातून होते. मूल्यशिक्षण समाजातून मिळत असते. पुस्तके सोडून आवश्यक संस्कार पालकांकडून होत असतात. विद्यार्थ्यांच्या पिढ्यांना मार्क्सवादी बनविण्यापेक्षा सुसंस्कारी पिढी घडविणाऱ्या पालकांना विद्यार्थ्यांसह समाजापुढे आणण्याचे दिशादर्शक काम मेणबुदले प्रतिष्ठान करीत आहे, असे प्रतिपादन वक्ते, कथाकथनकार डॉ. संजय कळमकर यांनी केले. येथील द.पां. मेणबुदले प्रतिष्ठानच्या आदर्श विद्यार्थी- पालक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
वीरशैव लिंगायत मठाधिपती ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य वाईकर अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे,पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, दिलीप पिसाळ महादेव मस्कर, साईनाथ वाळेकर, तेजपाल वाघ, रवींद्र कांबळे, कमल मेणबुदले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात पुणे महापालिकेतील उपायुक्त तुषार बाबर, अरुण बाबर, (किकली) चंद्रकांत बाबर , स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी श्रद्धा मराठे, तिचे पालक संगीता व अशोक मराठे (धोम) यांना रुपये १२ हजार ५००, मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
नव्या पिढीच्या तल्लख बुद्धीला दिशा देण्याची आवश्यकता सांगून आई-वडील आणि समाजऋणातून मुक्त होण्याचा प्रतिष्ठानचा उपक्रम आदर्श असल्याचे वाईकर महाराज यांनी सांगितले. तुषार बाबर व श्रद्धा मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वजीत मेणबुदले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महेश मेणबुदले, सूर्यकांत वालेकर सुनील जाधव, हिंदुराव डेरे, अजित जगताप, प्रशांत इनामदार, श्रीकांत वालेकर, सोमनाथ राऊत यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन, ॲड. विनायक मेणबुदले यांनी आभार मानले.

 

तुमच्या बातम्या पाठवण्यासाठी, प्रतिक्रिया, मत व्यक्त करण्यासाठी उजव्या हाताकडील व्हॉटसअप बटनवर क्लिक करा